निवडणुकीमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर
   दिनांक :12-Mar-2019
 
नागपूर : मंगळवारी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर ११ एप्रिलला मतदान होणार आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनाद्वारे १०, ११ व १२ या तारखांचे एकूण ७२ पेपर्स पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जारी करण्यात येईल. मतदान केंद्र म्हणून साधारणपणे निवडणूक आयोग शाळा व महाविद्यालय अधिग्रहित करतात. मतदानाच्या दिवसा व्यतिरिक्त आधीचे  २-३ दिवस देखील निवडणुकीचे काम तेथे सुरू असते. त्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याची माहिती नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.