आता धोका टळला, तणावही निवळला : पाक
   दिनांक :12-Mar-2019
इस्लामाबाद,
पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेला धोका आता पूर्णपणे टळला आहे आणि तणावही दूर झाला आहे, असा अंतर्गत आढावा घेणारा अंदाज पाकिस्तानने आज मंगळवारी काढला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांमधील तणाव आता बर्‍यापैकी कमी झाला असल्याचे आणि युद्धाचा धोकाही टळला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
 

 
 
भारत आता दहशतवादाच्या मुद्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, असा आम्हाला विश्वास वाटतो. भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे घुसून हल्ले केल्यानंतर हा देश पुन्हा आक्रमण करेल, अशी भीती आम्हाला वाटत होती, पण आता तसे काहीच होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती या बैठकीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने पत्रकारांना दिली. तणाव कमी व्हावा, यासाठी आम्ही अमेरिकेसह अनेक देशांना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले होते. त्यात यश आले असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.