अयप्पा मंदिराचा मुद्दा प्रचारात नको
   दिनांक :12-Mar-2019
...अन्यथा आचारसंहितेचा भंग
 
 
 
तिरुअनंतपुरम्‌,
शबरीमलै येथील अयप्पा मंदिरामध्ये सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या मुद्याचा निवडणूक प्रचारात उल्लेख केल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरेल, असा इशारा केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी टी. एन. मीना यांनी दिला आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर निवडणूक प्रचारात टीकाटिप्पणी करणारा राजकीय पक्ष, पक्षनेता यांच्यावर कारवाई केली जाईल. अयप्पा मंदिरात महिलांना देण्यात आलेल्या प्रवेशाबाबत किंवा त्याच्यावरील निकालाबाबत केली जाणारी वक्तव्ये हा धार्मिक प्रचार समजला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा असून, २३ एप्रिलला मतदान होणार आहे. अय्यपा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आव्हान याचिका दाखल करण्याचा केरळ देवस्थान मंडळाचा विचार होता. मात्र, कालांतराने मतपरिवर्तन होऊन या मंडळाने न्यायालयाचा निकाल मान्य केला. त्यानंतरही १० ते ५० वर्षे वयोगटातील ज्या महिला अयप्पा मंदिरात जाऊ इच्छित होत्या त्यांना भक्तांकडून अडविण्याचे प्रकार घडत होते. मात्र, २ जानेवारी रोजी पहाटे बिंदू अम्मिनी, कनकदुर्गा या दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करून इतिहास घडविला होता.