भारतीयांना कमी वयातच वाटू लागली वृद्धत्वाची जाणीव
   दिनांक :12-Mar-2019
 
 
वॉिंशग्टन: जपान वा स्वित्झर्लंड येथील नागरिकांच्या तुलनेत भारतात राहणार्‍या लोकांना वाढत्या वयाशी संबंधित समस्यांचा सामना लवकर करावा लागतो, असा अहवाल आरोग्यविषयक जगप्रसिद्ध नियतकालिक ‘लॅन्सेट’ने प्रकाशित केला आहे. भारतीयांना कमी वयातच वृद्धत्वाची जाणीव भेडसावू लागत असल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे.
वॉिंशग्टन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. यामध्ये संशोधकांनी जपान आणि स्वित्झर्लंड येथील ७६ वर्षीय व्यक्तींचा आणि भारतातील ६० वर्षांखालील व्यक्तींचा तौलनिक अभ्यास केला.
 

 
 
जपान आणि स्वित्झर्लंड येथील ७६ वर्षीय वयोगटातील व्यक्तींना ज्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो, त्याच समस्यांना भारतातील ६० वर्षांखालील नागरिकांना तोंड द्यावे लागते, असे या संशोधकांना सदर अभ्यासात आढळून आले आहे.
संशोधन चमूच्या प्रमुख अँजेला चँग वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हणाल्या, वयोमानाशी संबंधित समस्यांच्या परिणामी, व्यक्तीला लवकर निवृत्त होण्याची वेळ ओढवते. आरोग्यावरील खर्चही वाढतो. सरकारातील उच्चपदस्थांनी आणि इतर जबाबदार व्यक्तींनी ज्येष्ठ नागरिकांच्या वयोवर्धनाचे नकारात्मक परिणाम ओळखून, पावले उचलण्याची गरज आहे, असेही त्यांनी सुचविले आहे.