शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित ‘छत्रपती शासन’
   दिनांक :13-Mar-2019
नागपूर:
 नुसतंच ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करून छत्रपती शिवाजी महाराजांवरील उथळ प्रेम दाखविण्यापेक्षा त्यांच्या आदर्शांची, विचारांची आणि तत्त्वांची कास धरण्याची आता गरज आहे. त्यांची नेमकी भूमिका मांडणारा ‘छत्रपती शासन’ चित्रपट येत्या १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंडनिर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित हा चित्रपट उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले, खुशाल म्हेत्रे यांची निर्मिती आहे.
 

 
 
आजच्या तरुणाईला हा चित्रपट शिवशाहीबद्दल अचूक मार्गदर्शन करणारा आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. या प्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे यांनी या चित्रपटाच्या निमिर्तीचा आणि दिग्दर्शनाचा प्रवास अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने मांडला.
 
म्हेत्रे म्हणाले, छत्रपती शासन चित्रपट म्हणजे शिवभक्तांची हिंद भक्तांसाठी अर्पण केलेली कलाकृती आहे. अगदी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे किल्ले बनविणे, त्यांच्या गोष्टी ऐकणे यातून शिवाजी महाराजांचा इतिहास कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्यासमोर झळकतच असल्याने मनात त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटली.
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा वैचारिक प‘तिकार होता. महाराष्ट्राचे जे वेगवेगळे गुण आहेत किंवा व्यवस्थापनाची जी तत्त्वे किंवा कौशल्य आहेत, त्यातून भरपूर शिकण्यासारखे आहे. भरकटलेल्या तरुणाईपर्यंत शिवविचार पोहोचवणे हा या चित्रपटाचा मुख्य हेतू आहे.
 
मकरंद देशपांडे अनेक वर्षांनंतर मराठी चित्रपटात दिसणार आहेत. देशपांडे यांनी डॉ. समर्थ यांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका मकरंदसाठी एकदम योग्य आहे. आम्हाला मोठा कुणीतरी अभिनेता हवा होता. मकरंद हा मेहनती आहे. छत्रपती शासन चित्रपटाच्या एकूण उत्पन्नाचा १० टक्के भाग हा भारतीय सेनेला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपटातील चारही गाणी वेगळ्या धाटणीची आहेत. विशेष म्हणजे चित्रपटातील प्रत्येक गाण्याचं संगीत वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांनी केले आहे.
 
निर्माता, दिग्दर्शक म्हणून आव्हाने भरपूर असतात, पण अभ्यासपूर्ण पद्धतीने हा विषय जनतेसमोर मांडणे फार गरजेचे आहे. हा माझा पहिला प्रकल्प होता. दिग्गज कलाकार मकरंद देशपांडे व किशोर कदम हे अत्यंत प्रामाणिकपणे माझ्याबरोबर असल्याने तो अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. या मोठमोठ्या गोष्टी अगदी सहज शक्य होऊन छोट्या छोट्या होत गेल्या आणि चित्रपट तयार झाला, असेही ते म्हणाले.