धारणी सीमेवर अवैध शस्त्रसाठा जप्त
   दिनांक :13-Mar-2019
-निवडणुकीत उपयोगाची शंका
 
धारणी, 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारणी तालुक्याच्या सीमेपासून थोड्या अंतरावर मध्यप्रदेश पोलिसांनी दोघा जणांकडून  १५ बंदूका जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व पिस्तुली प्लास्टीकच्या कॅनमध्ये लपवून इतर ठिकाणी नेण्याची तयारी सुरू असताना ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने मेळघाट व वन्यजीव विभागाच्या जंगलाला लागूनच असलेल्या मध्यप्रदेशच्या पाचोरी गावात शस्त्रे बनविण्याचे अनेक गृह उद्योग सुरु असल्याचा पुरावा मिळालेला आहे.
 
धारणी तालुक्याच्या बारातांडा या सीमांत गावापासून अवघ्या २० किमी अंतरावरील मध्यप्रदेशच्या जंगलात पाचोरी (ठाणा खकनार) गाव असून सिकलीगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकांनी ह्या गावाला अवैध शस्त्र निर्मितीचे हब करुन सोडलेले आहे. दोन दिवसापूर्वी तापी नदीकाठी वसलेल्या शेखपूरा गावाजवळ जबलपूर पोलिसांनी १५ पिस्तुलींसह गुरुनामसिंग पटवा तथा गुरुचरणसिंग पटवा यांना मुद्देमालासह अटक केली. खुल्या बाजारात विदेशी बनावटीच्या मात्र पाचोरीत तयार केलेल्या या पिस्तुली २० हजार ते ३० हजार रुपये प्रती नग विकल्या जातात.
 
 
 
लोकसभेची रणधुमाळी सुरु झाल्याने या पिस्तुली कोणत्या शहरात पोचविण्यात येत होत्या, याविषयी माहिती आरोपींकडून काढण्यात येत आहे. सनद असो की पाचोरी मेड शस्त्रे यापूर्वी अकोला, अमरावती, खामगाव आणि नांदेड शहरात पुरविल्याची माहिती राज्य एटीएसजवळ आहे. जबलपूर येथील तीन जणांना पोलिसांनी शस्त्रांसह पकडलेले होते. त्यांनी खंडवा येथून पिस्तुली खरेदी केल्याचे कबूल केल्यावर खंडवा मध्यप्रदेशच्या पोलिसांसोबत जबलपूर एसटीएसने सदरची कारवाई केली, हे विशेष.
 
पाचोरी गावातील बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती करणार्‍या सिकलीगरांनी अनेकवेळी आत्मसमर्पण करुन पुनर्वसनाचा लाभ घेतलेला आहे. मात्र अवैध शस्त्रे बनविणे सोडलेले नाही. महाराष्ट्रातील अमरावती व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पाचोरी गाव येत्या निवडणुकीत राज्य पोलिसासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. बारातांडा ते देडतलई मार्गापर्यंत नियमित गस्त आता आवश्यक झाली आहे.