भाजपा-शिवसेनेचा शुक्रवारी महामेळावा
   दिनांक :13-Mar-2019
- दूपारी अमरावतीत, सायंकाळी  नागपूरात
- मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे येणार
 

 
अमरावती,
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून विविध पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकसभेत विदर्भातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे यासाठी भाजपा-शिवसेनाही जोर लावत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार १५ मार्च रोजी अमरावती व नागपूर येथे दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा व कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे.
 
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सकाळी ११ वाजता होणार्‍या या महामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. याच दिवशी सायंकाळी हे दोन्ही प्रमुख नेते नागपूर येथील मेळाव्यात मार्गदर्शन करतील. याशिवाय राज्यातले भाजपा व शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. 
 
भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांचा प्रचार एक दिलाने करण्यासाठी निवडणुकीच्या सुरुवातीलाच दोनही पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला. या निर्णयानुसार अमरावती व नागपूरला १५ मार्च, संभाजी नगर व नाशिकला १७ मार्च, नवी मुंबई व पुणे १८ मार्च रोजी मेळावे होणार आहे. अमरावतीत होणार्‍या मेळाव्याला अमरावती विभागातल्या अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील भाजपा व शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. याच प्रमाणे नागपूर विभागातही आयोजन होईल. महामेळाव्यात कार्यकर्त्यांना युतीच्या उमेदवारांचा प्रचार कशा पद्धतीने करायचा, या अनुषंगाने नेत्यांकडून योग्य मार्गदर्शन होणार आहे. या महामेळाव्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.