खोेडसाळ आरोपांबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा
   दिनांक :13-Mar-2019
-भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी
 

 
 
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अहमदाबाद येथे केलेल्या खोडसाळ आणि निराधार टिकेबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी भाजपाने आज निवडणूक आयोगाकडे  केली. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य घोषित करण्याची मागणीही यावेळी भाजपातर्फे करण्यात आली.
 
केंद्रीय मंत्री रविशंकरप्रसाद, निर्मला सीतारामन्‌, भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेत त्यांच्याकडे राहुल गांधी यांच्या भाषणाची तक्रार केली. राफेल व्यवहारातील कोट्यवधी रुपयांची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या खिशात घातली, असा आरोप अहमदाबाद येथील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी केला होता. खोडसाळ आरोप करत राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप भाजपाने निवडणूक आयोगाकडे केला. राहुल गांधी यांच्या आरोपांची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही भाजपाने आयोगाकडे केली.
 
निवडणुकीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये नेहमीच हिंसाचाराच्या घटना होत असतात, राज्यातील सद्यस्थिती पाहता यावेळीही निवडणुकीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संपूर्ण राज्य अतिसंवेदनशील घोषित करून राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याची मागणी रविशंकरप्रसाद यांनी केली. तसेच, राज्यात निवडणुकीच्या काळात वार्तांकनासाठी माध्यमांना मुक्त प्रवेश मिळेल, अशी व्यवस्था करण्याची विनंतीही भाजपाने आयोगाकडे केली.