दिल्ली वन-डेत भारत ३५ धावांनी पराभूत
   दिनांक :13-Mar-2019
नवी दिल्ली,
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात ३५ धावांनी विजय मिळवला. २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २३७ धावांवर आटोपला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी जिंकली.
 
 
 
उस्मान ख्वाजाचे शतक (१००) आणि पीटर हॅंड्सकॉम्बचे अर्धशतक (५२) यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गेल्या सामन्यात १४३ धावांची झंझावाती खेळी करणारा शिखर धवन १२ धावांवर बाद झाला आणि भारताला लवकर पहिला धक्का बसला. त्याने १५ चेंडूत २ चौकार लगावले. चांगली सुरुवात मिळालेला कर्णधार विराट कोहलीही लवकर बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. त्याने २२ चेंडूत २ चौकारांसह २० धावा केल्या. ऋषभ पंतही स्वस्तात झेलबाद झाला.
 
 
 
१६ चेंडूत १६ धावा करून तो बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. एकीकडे गडी बाद होताना रोहित शर्माचे मात्र संयमी खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीच्या जोरावर त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील ८ हजार धावांचा टप्पा गाठला. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर २१ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. त्या धक्क्यातून भारत सावरत असतानाच एकाच षटकात रोहित आणि जाडेजा बाद झाले. रोहितने ४ चौकारांसह ८९ चेंडूत ५६ धावा केल्या. तर जाडेजा शून्यावर माघारी परतला. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर भुवनेश्वर (४६) तर केदार (४४) धावांवर बाद झाला. त्यानंतर शमीदेखील १ धाव करून बाद झाला. अखेर कुलदीप यादवचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला.