भारत आज खेळणार चार सामने
   दिनांक :13-Mar-2019
नवी दिल्ली,
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पाच सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक आणि अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. पण भारत फक्त मालिकेतील अंतिम सामना खेळणार नसून एकाच वेळी चार अंतिम सामने खेळणार आहे.
 
 
 
मालिकेतील अंतिम सामना
भारत वि. ऑस्ट्रेलियात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाते आहे. या मालिकेत पहिले दोन सामने भारत जिंकला तर चंडिगड आणि रांची येथे खेळलेल्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. सध्या या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया २-२ने बरोबरीत आहेत. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी हा सामना जिंकणं भारताला गरजेचं आहे. हा सामना त्यामुळे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक ठरतो आहे.
विश्वचषकाआधीचा अंतिम सामना
या सामन्यानंतर भारतीय संघ थेट एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहे. २५ मेला विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडविरोधात भारताची पहिली मॅच होणार आहे. त्यामुळे ७७ दिवस भारतीय संघ एकही वनडे सामना खेळणार नाही. या कालखंडात विश्वचषकासाठी भारतीय संघाला कसून सराव करावा लागेल.
विश्वचषकाच्या टीमसाठी अंतिम सामना
भारताचा विश्वचषकाचा संघ अजून निश्चित झालेला नाही. त्यामुळे या सामन्याच्या खेळीवरून कोणते खेळाडू उर्वरित जागांसाठी घ्यायचे आणि कोणते खेळाडू वगळायचे हे निश्चित होणार आहे. भारताकडून चौथ्या नंबरला कोणता खेळाडू खेळेल अजून निश्चित झालेलं नाही. त्यामुळे टीम निश्चित करण्यासाठीही हा सामना अंतिम ठरणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलियामधील शेवटची पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील ही शेवटची पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आहे. २०२०पासून ओडिआय लीग लागू होणार असून या नियमानुसार तीनहून जास्त सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळल्या जाणार नाहीत. त्यामुळे हा भारत-ऑस्ट्रेलियामधील शेवटच्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना ठरणार आहे.