आदित्य सध्या निवडणूक लढवणार नाही – उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती
   दिनांक :13-Mar-2019
शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कोणतही बंधन घातलं नव्हतं त्याचप्रमाणे मी सुद्धा आदित्यवर कोणतही बंधन घातलेलं नाही. आदित्य सध्या तरी निवडणूक लढवणार नाही. पण भविष्यात निवडणूक लढवायची की नाही ते तो स्वत:हा आणि शिवसैनिक ठरवतील असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आदित्य ठाकरेच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

 
 
आदित्य ठाकरे लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक लढवणार का ? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी आदित्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही हे स्पष्ट केले. यासंबंधी तुम्ही त्याच्याशीच चर्चा करा असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार असून एक ते दोन दिवसात उमेदवार जाहीर करु असे उद्धव म्हणाले.
शिवसेना-भाजपा युतीमध्ये कोणताही दगाफटका होणार नाही असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. आम्ही आडून कोणताही वार केलेला नाही असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या रणनीतीचा आराखडा तयार केलाय. काही निर्णय घेतले आहेत. आणखी बरेच पत्ते आहेत ते आता उघड करणार नाही. युतीत मिठाचा खडा कोणी टाकू शकत नाही असे उद्धव म्हणाले. शरद पवार हे अष्टपैलू आहेत. नेता म्हणून ते चांगले आहेत पण भविष्य कधीपासून सांगायला लागले. पार्थ पवार यांच्या निवडणुकीसाठी जर पाहिले तर पवार सांगतात त्याच्या विरुद्ध करतात असे दिसते असे उद्धव म्हणाले.
माझ्या मुलाबरोबर मी इतरांच्या मुलाचेही लाड करतो. इतरांची पोर मी धुणी भांडी करण्यासाठी वापरणार नाही असे सांगून त्यांनी शरद पवारांना टोला लगावला. सुजय विखे पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कालच सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.