२० गुंठ्यात विदेशी भाजीपाल्याची प्रयोगशील शेती
   दिनांक :13-Mar-2019
  यशोगाथा
  पवनकुमार लढ्‌ढा
  चिखली
 
काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल, तर तुमच्या मार्गात अडथळे येऊनही यश मिळू शकते, हे येळगाव येथील शेतकरी अभिनेते विष्णू गडाख या युवकाने दाखवून दिले. विदेशी भाजीपाला पिकवून त्याला स्वतः ग्राहक तयार केले आणि मागील चार वर्षांत घेतलेल्या मेहनतीचे फळ आता पदरात पडू लागले. बुलडाणा ते चिखली रस्त्यावर येळगाव धरणाला लागूनच गडाख यांची केवळ २० गुंठे जमिनीवर विदेशी भाजीपाल्याची प्रयोगशील शेती आहे. गडाख यांची १९७६ साली वडिलोपार्जित आठ एकर शेती धरणामध्ये गेली, त्यामुळे चार भावांमध्ये त्यांच्या वाट्याला २० गुंठे शेती आली. यामध्ये ते पूर्वी पारंपरिक पिके घ्यायचे. वर्षभरात यातून सात-आठ हजारांपेक्षा अधिक काही हातात पडत नव्हते. त्यानंतर भाजीपाल्याकडे ते वळले. यातही पुढे जात त्यांनी विदेशी भाजीपाला लागवडीकडे लक्ष केंद्रित केले. काळाची पावले ओळखत त्यांनी हा बदल करून २० गुंठे क्षेत्रातून उत्पन्नाचे स्रोत बळकट केले आहेत.
 
 
 
सन २०१५ पासून त्यांनी टप्प्याटप्याने हा भाजीपाला पिकवणे सुरू केले. यामध्ये अमेरिकन ब्रोकोली, लेट्यूस, रेड कॅबेज, यलो ग्रीन झुकीनी, बेबीकॉर्न, रेड रॅडीश अशा विविध विदेशी भाजीपाल्यासह नवलकोल, शलगम आदी भाजीपाल्याचीही लागवड करतात. सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधी या भाजीपाल्याच्या लागवडीसाठी अनुकूल असतो.
 
विदेशी भाजीपाला या भागात पिकेल किंवा नाही, याची काहीही माहिती त्यांना सुरवातीला नव्हती. परंतु, अनेकदा इंटरनेटवर अशा भाजीपाल्याची माहिती त्यांनी बघितलेली असल्याने याबाबत उत्सुकता वाढली होती. यात उतरण्यापूर्वी त्यांनी चार वर्षांपूर्वी युट्युबवर असंख्य व्हिडीओ बघितले. या भाज्यांचे गुणधर्म काय आहेत, या माहितीची जुळवाजुळव सुरू केली. एकाएका भाजीपाल्याची माहिती गोळा करीत लागवडीला सुरवात केली. यासाठी लागणारे बियाणे ऑनलाईन मागविले. येळगाव परिसरात भाजीपाल्याच्या शेतीसाठी वातावरण पोषक असल्याने या विदेशी भाज्या घ्यायला कुठलीही अडचण आली नाही. आता त्यांना या भाज्यांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत कुठली कामे करावी लागतात, कुठला हंगाम चांगला राहतो, याचा अनुभव मिळाला.
 

 
 
विदेशी भाज्यांची चव पंचतारांकित हॉटेल्समध्ये सहसा चाखायला मिळते. सामान्य ग्राहक त्याबाबत अनभिज्ञच आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागात विष्णू यांनी विदेशी भाजीपाला लागवडीचे धाडस केले. भाजीपाल्याची संपूर्ण माहिती गोळा करीत पत्रके बनविली. स्वतः उत्पादित केलेल्या या भाज्यांची बाजारात स्वतः हातविक्री सुरू केली. सुरवातीला अनेक दिवस ग्राहक यायचे, भाज्या पाहून आश्र्चर्य व्यक्त करायचे; मात्र खरेदी करण्याचे धाडस करीत नव्हते. त्यामुळे सुरवातीला या भाज्यांच्या लागवडीचा जेमतेम खर्च निघत होता. विष्णू यांनी मात्र जिद्द सोडली नव्हती. आता ग्राहक त्यांच्या येण्याची प्रतीक्षा करतात. या भाज्यांना किलोला ६० ते ८० रु. भाव मिळतो. दररोज विक्रीतून ८०० ते १००० रुपये मिळतात.
 
पदवीधर असलेले विष्णू हे येळगावात गेली अनेक वर्षे इंग्रजी विषयाची शिकवणी घेतात. सकाळी लवकर उठून योगा करून आजही ते सकाळी ११ वाजेपर्यंत चार बॅचेस घेतात. त्यानंतर पत्नीसह शेतात कामाला येतात. दुपारपर्यंत भाजीपाला काढून सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत बाजारात स्वतः विक्री करतात. शेतात जायला बारमाही रस्ता नाही. अशा स्थितीत दुचाकीला क्रेट बांधून त्याद्वारे वाहतूक करतात. ही सर्व कामे कुठल्याही अडचणी न सांगता ते आनंदाने करतात. कृषी विभागानेही विष्णू यांच्या शेतीची दखल घेतली आहे.
 
छोटे क्षेत्र असल्याने बैलजोडी बाळगणे परवडत नाही. गरजेच्या वेळी भाड्याने मशागत करून घेतात. आंतरमशागतीसाठी सायकलचलित कोळपणी यंत्राचा वापर केला जातो. पिकात कोळपणी, मातीचा भर देणे, सरी तयार करणे आदी कामांसाठी हे यंत्र उपयोगी ठरते, असे विष्णू सांगतात. विष्णू गडाख यांना अभिनयाची आवड आहे. या छंदातून त्यांनी पाच मराठी चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या. देव माझा शेगावीचा गजानन, युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले, हीच बायको पाहिजे, अशा चित्रपटांमध्ये अभिनय केला. सोबतच ते व्याख्यानेही देतात. वारकरी संप्रदायाची कास धरीत, आध्यात्मिक विचार समाजात नेण्यासाठी ते प्रवचनही करतात.
•