बोइंग ७३७ मॅक्स विमान उड्डाणांवर भारताने घातली बंदी
   दिनांक :13-Mar-2019
नवी दिल्ली
 इथोपियन दुर्घटनेनंतर भारताने बोइंग ७३७ मॅक्स-८ विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. इथोपियन एअरलाइन्सचे विमान बोइंग ७३७ (मॅक्स ८००) कोसळल्यानंतर जगातील किमान १० देशांनी बोइंगची त्या पद्धतीची विमाने जमिनीवर उतरवली आहेत. या बोइंग 737 मॅक्स-8 विमान दुर्घटनेत 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. बोइंगच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर भारताने या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. स्पाइस जेट, जेट एअरवेज एअरलाइन्सकडे असलेल्या बोइंग विमानांचा वापर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) बोइंगच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर हा निर्णय घेतला आहे. विमानं उड्डाणांसाठी योग्य असल्याचे सिद्ध होईपर्यँत , या विमानांचा उड्डाणासाठी वापर करू नये, असेही डीजीसीएने सांगितले आहे. तसेच या विमानांचे उड्डाण करणाऱ्या पायलटकडे किमान १००० तासांच्या उड्डाणाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
 
 
स्पाइस जेट या भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कंपनीकडे बोइंगची १३ विमाने आहेत. तर, १५५ विमानांची ऑर्डर दिलेली आहे.उड्डाणांवर प्रतिबंध आणणा-या देशांच्या यादीत भारत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझिल, चीन, सिंगापूर यांचा समावेश झाला आहे. दक्षिण कोरयातील एका कंपनीनेही बोइंगचे उड्डाण थांबविले.