ब्रेग्झिट करार मतदान; थेरेसा मे यांचा दुसऱ्यांदा प्रभाव
   दिनांक :13-Mar-2019
युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबतच्या ब्रेग्झिट समझोत्यावर ब्रिटनच्या प्रतिनिधीगृहात मंगळवारी मतदान झाले. हा करार प्रतिनिधी गृहाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. ब्रेग्झिट करारावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पंतप्रधान थेरेसा दुसऱ्यांदा हादरा बसला असून ३९१ विरुद्ध २४२ मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

 
ब्रिटनच्या जनतेने २०१६ मध्ये ब्रेग्झिटच्या बाजूने निसटता कौल दिल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या थेरेसा यांनी दोन वर्षे युरोपीय महासंघाशी वाटाघी केल्या. त्यासंदर्भातील ब्रेग्झिट करारावर मंगळवारी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मतदान झाले. ३९१ विरुद्ध २४२ मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. यंदा थेरेसा मे यांना १४९ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. मे यांच्या हुजूर पक्षाच्या ७५ खासदारांनी ब्रेग्झिटविरोधात मतदान केले. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यावेळी थेरेसा मे यांना कमी मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. जानेवारीमध्ये झालेल्या मतदानात थेरेसा मे यांना ४३२ विरुद्ध २०२ म्हणजे तब्बल २३० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
ब्रेग्झिटचा तिढा
 
२३ जून २०१६ रोजी झालेल्या सार्वमतात ब्रिटनच्या नागरिकांनी ५२ टक्के विरुद्ध ४८ टक्के अशा बहुमताने २८ देशांच्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला. यामुळे युरोपीय महासंघात कायम राहण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केलेल्या आणि सार्वमत पुकारलेल्या हुजूर पक्षाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. कॅमेरून यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या शर्यतीत, ब्रेग्झिटचे प्रमुख समर्थक बोरिस जॉन्सन यांनी अपेक्षेप्रमाणेच आपले नाव पुढे केले नाही. त्यामुळे युरोपीय महासंघात राहण्याला पाठिंबा दिलेल्या अंतर्गत मंत्री थेरेसा मे या पंतप्रधान झाल्या. सरकारने निश्चित केलेल्या दोन वर्षांच्या वेळापत्रकानुसार ब्रिटन येत्या २९ मार्चला महासंघातून बाहेर पडावे लागणार आहे. त्यापूर्वी ब्रिटन पार्लमेंटमध्ये हा करार मंजूर होणे आवश्यक होते. आता ब्रिटनने विनंती केल्यास मुदतवाढ दिली जाईल पण त्यासाठी ब्रिटनला महासंघातील २७ सदस्य देशांना यासाठी समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे महासंघातील सूत्रांनी सांगितले.