पाकच्या 'त्या' वैमानिकाची माहिती आमच्याकडे - निर्मला सीतारामन
   दिनांक :13-Mar-2019
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानचे जे एफ-१६ फायटर विमान पाडले. त्या विमानाचा वैमानिक कोण होता, त्याची ओळख काय आहे त्याबद्दल भारतीय लष्कराकडे माहिती आहे असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी सांगितले. भारताने आतापर्यंत अनेकदा पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याचा दावा केला आहे. पण पाकिस्तानने त्यांचे एफ-१६ विमान पडल्याचे मान्य केलेले नाही.
 
 
त्यापार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी प्रथमच केलेले हे विधान अत्यंत महत्वपूर्ण आहे. २७ फेब्रुवारीच्या सकाळी राजौरीच्या आकाशात भारत-पाकिस्तानच्या फायटर विमानांमध्ये लडाई झाली. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ बायसन विमान पडले. पण त्याचवेळी त्यांनी सुद्धा पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडले होते.
कारगिल युद्धाच्यावेळी पाकिस्तानने ज्या प्रमाणे आपल्या सैनिकांचे बलिदान मान्य केले नव्हते तसेच ते आता सुद्धा आपले एफ-१६ विमान पडल्याचे आणि वैमानिक गमावल्याचे मान्य करणार नाही असे निर्मला सीतारमन यांनी सांगितले. पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाच्या वैमानिकाला पाकव्याप्त काश्मीरमधील गावकऱ्यांनी मारहाण केली व रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे असे सीतारमन म्हणाल्या.
पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असताना विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा मानसिक छळ करण्यात आला. पण एवढे सर्व सहन केल्यानंतरही ते शांत असून त्यांचा जोश हाय आहे असे त्या म्हणाल्या. मी माझे कर्तव्य बजावले. आम्हाला अशा परिस्थितीसाठीच प्रशिक्षण दिले जाते असे अभिनंदन यांनी सांगितल्याचे निर्मला सीतारमन म्हणाल्या.