नागपूर स्थानकाला अनधिकृत हॉकर्सपासून 'आझादी'
   दिनांक :13-Mar-2019
- ज्योतिकुमार सतिजा यांची माहिती
नागपूर,
नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर नेहमी निरनिराळ्या जीवनोपयोगी वस्तू विक्रीस घेऊन बसणारे हॉकर्स बघायला मिळायचे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. पंरतु, गेल्या ६३० दिवसांपासून मध्य रेल्वेचे नागपूर स्थानक अनधिकृत हॉकर्स आणि वेंडर्समुक्त झाले असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी दिली.
 
 
 
ज्योतिकुमार सतिजा यांची वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पदावरून पदोन्नती झाली असून, त्यांची लखनौला आरपीएफचे विशेष पोलिस महानिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी ४ वर्षांच्या कार्यकाळात आरपीएफने केलेल्या कामाची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
 
यावेळी सतिजा यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान नेहमीच तत्पर असतात. मागील चार वर्षांमध्ये आरपीएफने जवळपास ३२३१ चांगली कामे केली. रेल्वे स्थानकावर हात सुटून हरवलेल्या, विविध कारणांमुळे घरून पळून आलेल्या अशा १०७२ बालकांना आरपीएफ जवानांनी सुखरुप त्यांच्या पालकांच्या सुपूर्द केले आहे. याशिवाय १ कोटी ४० लाखांचा गांजा, १ कोटी १५ लाखांची अवैध दारू जवानांनी पकडली आहे. रेल्वे स्थानकावर qकवा गाडीत चोरीला गेलेल्या २५.८४ लाखांचे मोबाईल संच पकडण्यात आले. ३.११ कोटींचे दागिने व बेहिशेबी रक्कम आरपीएफ जवानांनी पकडली.
 
ई-तिकिटांचा काळाबाजार करणाèयांवर कारवाई करण्याकरिता ४ नोव्हेंबर रोजी देशभरात धाडी टाकण्यात आल्या; यातून १.१३ कोटींची बनावट तिकिटे जप्त करण्यात आली. सर्वसामान्य प्रवाशांना मदत व्हावी आणि आरपीएफ जवानांचे मनोबल उंचवावे याकरिता आरपीएफ विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. समाजजागृतीकरिता नो हॉर्न, से नो टू तंबाखू आदी उपक्रम हाती घेण्यात आले. जवानांचे आरोग्य जपण्याकरिता प्रत्येक महिन्यात त्यांच्या बॉडी मास इंडेक्सच्या तपासणीची सुरुवात करण्यात आली. या सर्व बाबींचा प्ररिणाम म्हणून विविध पुरस्कारदेखील नागपूर विभागातील आरपीएफ जवानांना मिळाले आहेत.
 
 
१०० फूट राष्ट्रध्वजाची स्वप्नपूर्ती
 
 
  
देशातील विशेष रेल्वेस्थानकावर १०० फूट उंच राष्ट्रध्वज लावण्यात यावे, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली होती. ज्या दिवशी तो ध्वज नागपूर स्थानकावर लावण्यात आला, तेव्हा स्वप्नपूर्ण झाल्याची अनुभूती झाली, असे ज्योतिकुमार सतिजा यांनी सांगितले.