मूल्यशिक्षण ही काळाची गरज
   दिनांक :13-Mar-2019
गेल्या 15-20 वर्षांत सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. अनेक प्रकारची स्थित्यंतरे घडून आल्यामुळे पूर्वीच्या आणि आजच्या स्थितीत बदल अनुभवास येत आहेत. पूर्वी आजच्यासारखी स्पर्धा नव्हती. विविध अभ्यासक्रमांना सहज प्रवेश मिळायचा अन नोकर्‍याही अगदी सहज उपलब्ध असत. आज गळेकापू स्पर्धा पाहायला मिळते आहे. अभ्यासक्रमांना गुणवत्तेच्या आधारावर आणि नोकरीत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश मिळतो. या स्पर्धेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जे स्पर्धेत टिकू शकत नाहीत, ते गैरमार्गाचा अवलंब करतात. अनैतिक मार्गाने शाळा-कॉलेज प्रवेश मिळवितात, पैसा देऊन नोकरी मिळवितात. यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. जे पात्र उमेदवार आहेत, ते नोकरीत डावलले जातात आणि नालायकांना संधी मिळते. आपली एकूणच व्यवस्था भ्रष्ट झाली आहे. या भ्रष्ट व्यवस्थेत प्रामाणिक लोकांवर अन्याय होतो. भ्रष्ट व्यवस्थेत जो व्यवस्थित राहात नाही, त्याचाच बळी जातो. तुम्ही जर व्यवस्थेचा भाग बनलात तर तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. पण, तुम्ही भ्रष्ट व्यवस्थेला स्वीकारले नाही, तर तुम्हाला त्रास दिला जातो. अनेक िंहदी-मराठी सिनेमांमधून आपल्याला अशी उदाहरणे पाहायला मिळतात. चित्रपटात अशी उदाहरणे का घातली जातात? कारण, वस्तुस्थितीच अशी आहे. प्रामाणिक माणसांना समाजात स्थान नाही. तुम्ही जेवढे प्रामाणिक तेवढे व्यवस्थेच्या दृष्टीने नालायक. तुम्ही जेवढे प्रामाणिक तेवढे बेईमानांना नकोसे. ही स्थिती विचारात घेतली तर प्रामाणिक राहणे हा गुन्हाच.
 

 
 
 
गेल्याच वर्षी गुजरातमधील वडोदरा येथील एका शाळेत घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी होती, िंचता वाढविणारीही होती. गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाने रागावले, या रागावण्याचा राग विद्यार्थ्याला आला. याच रागातून त्याने शाळा बंद पाडण्याचा फैसला करून टाकला. एखाद्या विद्यार्थ्याला ठार मारले तर शाळाच बंद पडेल, या भावनेने त्याने शाळेच्या स्वच्छतागृहात अन्य एका विद्यार्थ्यावर चाकूने सपासप 30 वार केले आणि त्याला ठार मारले. झाले, पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर दोषारोपण सुरू केले, व्यवस्थापन हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप केला. पोलिस ठाण्यावरही मोर्चा नेण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविताच खरा प्रकार उघडकीस आला अन सगळेच सुन्न झाले. हरयाणातील एका शाळेतही असाच प्रकार घडला असताना स्कूल बसच्या कंडक्टरवर संशय घेऊन त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याला झोडपण्यातही आले होते. पण, खरा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा वेळ निघून गेली होती. ईर्ष्येतून एका विद्यार्थ्याने दुसर्‍या विद्यार्थ्याची हत्या केली होती. हे प्रकार का घडतात आणि ते घडू नयेत यासाठी काय केले पाहिजे, यावर आता गंभीरपणे िंचतन करणे आवश्यक आहे.
तीनचार वर्षांपूर्वी औरंगाबाद येथे घडलेली एक अतिशय दु:खद घटना अजूनही विस्मरणात जायला तयार नाही. मूळची औरंगाबादची पण अंबाजोगाई येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकणारी प्रतीक्षा हिचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून गेला. तिचा नैसर्गिक मृत्यू नाही झाला. तिने आत्महत्या करून स्वत:ला संपविले. प्रतीक्षा अतिशय हुशार होती, मनमिळावू होती. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी होती. तरीही तिला आत्महत्या करावी लागली. तिने आत्महत्या का केली होती? तिचा दोष एकच होता तो म्हणजे जन्मजात हुशारी अन मनाने संवेदनशील. अभ्यासात ती फारच हुशार होती. मैत्रिणींच्या पुढे होती. एमबीबीएसच्या प्रथम वर्षात तिने सगळ्या मैत्रिणींना मागे टाकत आघाडी घेतली होती. बस्स, मैत्रिणींमध्ये तिच्याप्रति ‘जेलसी’ निर्माण झाली. तिच्या हुशारीचा तिच्याच मैत्रिणी द्वेष करायला लागल्या. त्यातून त्यांनी सगळ्यांनी मिळून तिला लक्ष्य केले. वसतिगृहात राहणार्‍या तिच्या मैत्रिणींनी तिच्यावर अनेकदा खोटे आरोप केलेत. तिने आमच्या नोटस चोरल्या आहेत, असाही आरोप मैत्रिणींनीच केला अन याचा प्रतीक्षाला फार मानसिक त्रास झाला. कारण ती अतिशय संवेदनशील मनाची होती. तिला हे आरोप सहन झाले नाहीत. मानसिकदृष्ट्या ती अतिशय खचली होती. अशा खचलेल्या मानसिक अवस्थेत ती औरंगाबादला घरी आली होती. कारण, परीक्षा संपल्यामुळे सुट्या लागल्या होत्या. घरी आल्यानंतर तिने याची माहिती वडिलांना दिली होती. आता पुन्हा मी तिथे शिकायला जाणार नाही, असे तिने बोलून दाखविल्याने वडिलांनीही तिची समजूत काढली. तिच्या मैत्रिणींनाही वडिलांनी दूरध्वनी करून समजून सांगितले. पण, प्रतीक्षाच्या मनाची तयारी होत नव्हती. वडिलांनी जर पुन्हा जायला सांगितले तर आपल्याला जावेच लागेल अन पुन्हा मैत्रिणींचा जाच सहन करावा लागेल, या भीतीने तिला झोप लागत नव्हती. अखेर एक दिवस तिने या सगळ्यांवर तोडगा काढताना स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतला. तिने आत्महत्या केली. अतिशय टोकाचा निर्णय तिने घेतला अन घरच्यांना व आप्तेष्टांना कायमचे दु:ख देऊन गेली. वडिलांनी समजूत घातल्यानंतरही तिने हे टोकाचे पाऊल उचलले, याचा अर्थ ती जरा जास्तच संवेदनशील मनाची होती. तिला त्रास देणार्‍यांची नावे प्रत्यक्षात जरी तिने लिहून ठेवली नसली तरी तिच्या वडिलांना ती माहिती होती. त्याआधारे मैत्रिणींविरुद्ध तक्रार केली जाणे अपेक्षित होते. तक्रार झाली की नाही माहिती नाही. पण, कॉलेजमधील मैत्रिणींनी केलेल्या रॅिंगगमुळे एका हुशार मुलीचा हकनाक मृत्यू झाला. देश एका हुशार भावी महिला डॉक्टरला मुकला होता.
 
देशात रॅिंगगविरोधी कायदा लागू आहे. या कायद्यान्वये शिक्षाही केली जाते. तरीही विद्यार्थ्यांना धाक राहिलेला दिसत नाही. मूल्य शिक्षणावर भर दिला जात नसल्याने आणि घरी आईवडिलांकडून अवास्तव अपेक्षा केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. हा परिणाम नकारात्मक असतो. आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, मग आपल्या मित्रमैत्रिणींना तरी त्या का पूर्ण करू द्यायच्या, असा नकारात्मक विचार विद्यार्थ्यांकडून केला जातो. विद्यार्थी-विद्यार्थिनींपेक्षा त्यांच्या पालकांनाच मुलांच्या गुणांबद्दल जास्त आकर्षण असते. माझ्याच मुलाला िंकवा मुलीला जास्त गुण मिळाले पाहिजेत, अशी ईर्ष्या असते. एखाद्याला सर्वाधिक गुण मिळवून पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काही नसते. पण, इतरांबद्दल जेव्हा मनात मत्सराची भावना निर्माण होते आणि त्या भावनेतून जेव्हा त्रास दिला जातो, तेव्हा तो प्रकार अनैतिक अन अनावश्यक मानला पाहिजे. आपल्याला पुढे जायचे आहे म्हणून आपल्या वर्गातील हुशार अन संवेदनशील मनाच्या मुलींना त्रास द्यायचा, त्यांना हैराण करायचे, वेगवेगळ्या माध्यमातून भावनात्मक छळ करायचा, अतिशय गलिच्छ आरोप करून त्यांची प्रतिमा मलीन करायची अन सरतेशेवटी त्यांना शाळा-कॉलेज सोडण्यास वा आत्महत्या करण्यास बाध्य करायचे, असले कृत्य हा नैतिक मूल्यांच्या आणि संस्कारांच्या अभावाचाच परिणाम म्हटला पाहिजे.
 
यावर मूल्य शिक्षण हाच एक चांगला आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. मुलामुलींप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रशिक्षण आणि प्रबोधन करणेही आता आवश्यक झाले आहे. इतरांची रेष पुसण्यात आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा, इतरांचा द्वेष करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपली रेष त्यांच्यापेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त उत्तम!