त्यांच्या येण्याचा अर्थ एवढाच की...!
   दिनांक :14-Mar-2019
राहुल गांधी असोत की राज ठाकरे, शरद पवार असोत की सोनिया गांधी, भाजपावर तोंडसुख घेताना इतर कामांसाठी जराशी फुरसत नसलेल्या या तमाम नेत्यांच्या चेल्याचपाट्यांमध्ये भाजपाप्रवेश करण्यासाठीची जी शर्यत गेल्या काही दिवसात लागली आहे, ती बघितल्यावर पुढील निवडणुकीचे निकाल कोणती दिशा दर्शविताहेत, याचे वेगळ्याने उत्तर देण्याची गरज उरत नाही. उपरोक्त नेत्यांनी जाहीर सभांमधून भाषणं ठोकताना लाख अमान्य केले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र कृतीतून ‘हवा कुणाची’ ते सिद्ध करताहेत. निवडणुकीच्या मुहूर्तावर केवळ राजकीय पक्षाचीच नव्हे, तर सत्तातुरांचीही लगीनघाई सुरू झालेली दिसते आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना स्वत:च्या घरातच कॉंग्रेस पक्ष अबाधित राखता आला नसल्याची परिस्थिती तर अगदीच दयनीय आहे.
 
कालच त्यांच्या मुलाने भाजपाचे घर जवळ केले आहे. खुद्द राधाकृष्ण विखे पाटीलही मुलाने स्वीकारलेला मार्ग योग्य ठरवत केव्हा कॉंगे्रसला रामराम ठोकतील अन्‌ मुलाच्या पाठोपाठ ते भाजपात दाखल होतील, सांगता येत नाही, अशी स्थिती असताना, राहुल-सोनियांनी भाजपाच्या वाट्याला जाण्यात अर्थ तरी काय उरतो, हा खरा प्रश्न आहे. एरवी माध्यमांसमोर कायम मुजोरी करण्यासाठी ख्यात असलेल्या जितेंद्र आव्हाडांना राज्यात ‘मुले’ पळवणारी टोळी सक्रिय झाली असल्याचा साक्षात्कार झाला आहे. आपल्या पालकांनी आयुष्यभर जोपासलेला पक्ष सोडून सैरावैरा पळत सुटलेली ही ‘मुले’ त्यांच्या घरच्यांनाच सांभाळता आलेली नसल्याची दयनीय अवस्था, आव्हाड स्वत:च्या अगतिकतेतून स्पष्ट करतात, यातच सारे आले. 2014 च्या निवडणुकीनंतर देशात उसळलेली परिवर्तनाची लाट दिवसागणिक दृढ होत असल्याची वस्तुस्थिती त्यातून स्पष्ट होते ते वेगळेच. 
 
 
यंदाची निवडणूक तर आताकुठे जाहीर झाली आहे. निवडणुकीचे अर्ज सादर होईपर्यंत भाजपाविरोधकांपैकी कोण कोण स्वत:चे घर शाबूत ठेवतो अन्‌ कुणाकुणाची दांडी उडते, हे येणारा काळच सांगेल. ही खरंतर सत्तातुरांची राजकीय खेळी आहे. ही टोळी कायम सत्तेच्या अवतीभोवती फिरत राहिली आहे. वर्षानुवर्षे. कालपर्यंत सत्ता कॉंग्रेसच्या पारड्यात होती. तेव्हा ते कॉंग्रेसचा ढोल बडवत होते. तिकडे राहून सत्तेचा उपभोग घेत होते. आज सत्ता भाजपाच्या बाजूने आहे म्हटल्यावर त्यांचा नूर अचानक पालटला आहे. त्यांना ना विचारांची बैठक, ना नीतिमत्तेची चाड. अशांसाठी पक्षाची कवाडे फारतर किलकिली करायची की सताड उघडी ठेवायची, याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेण्याचीही गरज आता निर्माण झाली आहे.
 
मुद्दा, बिहारमध्ये सुरुवातीला भाजपाशी फारकत घेणार्‍या नितीश कुमारांनी नंतरच्या काळात लालूंना लाथ मारून पुन्हा भाजपाच्या सोबतीने येण्याचा असो, की मग मुंबईत कॉंग्रेसच्या कालिदास कोळंबकरांनी स्वत:च्या निवडणूक फलकांवर मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र लावायला सुरुवात करण्याचा असो, ही जमात वार्‍याची दिशा बघून वागणार्‍यांची आहे. कायम सत्तेत राहण्याची सवय जडलेल्या या नेत्यांना आता ‘हवा’ भाजपाची असल्याची आणि पुढची कित्येक वर्षे कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची दूरान्वयेही शक्यता नसल्याची वस्तुस्थिती ध्यानात आली आहे. परिणामी आपापल्या होड्या त्यांनी त्या दिशेने वल्हवणे सुरू केले आहे. त्यातून त्यांचा स्वार्थ तर झळकतोच, पण देशातील भविष्यातील राजकीय कलही त्यातून पुरेसा स्पष्ट होतो.
 
आज वार्‍याची दिशा बघून भाजपात प्रवेश करण्यासाठी धडपडणार्‍यांपैकी कित्येक लोक असे आहेत, जे कालपर्यंत भाजपाच्या नावाने शंख करीत होते. कडाकडा बोटे मोडीत होते. या पक्षाला, त्याच्या कार्यकर्त्यांना जातीयवादी ठरवण्यातही ते आघाडीवर होते. त्या कार्यकर्त्यांना कस्पटासमान लेखण्यात, त्यांची खिल्ली उडवण्यात यांचा वाटा मोलाचा होता. पण, काळाच्या ओघात नियतीने केलेल्या कहराचा परिणाम हा आहे की, आज त्याच भाजपाच्या राजकीय आश्रयाला उभे राहण्याची वेळ कॉंग्रेसच्या कथित निष्ठावंतांवर आली आहे. सत्तेबाहेर राहिले की जीव कासावीस होणार्‍यांची ही राजकीय फरफट योग्य की अयोग्य, परिस्थिती बघून फासे टाकण्याची त्यांची रीत चूक की बरोबर, हे मतदारांच्या मताधिकारातून स्पष्ट होईलच भविष्यात. या आयाराम-गयारामांना उचलून धरायचे की धूळ चारायची, या संदर्भात योग्य तो निर्णयही घेतीलच मतदार योग्य वेळी. पण, आजघडीला तरी शर्यत सत्तेच्या शर्यतीत सहभागी होण्याची आहे.
 
यादीही बघा ना किती लांबत चालली आहे, शर्यतीत सहभागी होण्यासाठीची. सुजय विखे पाटीलांनी तर फक्त सुरुवात केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, रणजितिंसह मोहिते पाटलांसारखी नावं अजून रांगेत आहेत. त्यांनी आपले विचार, पक्ष बदलण्यामागील राजकीय कारणांची, वास्तवाची मीमांसा होईलच कालौघात, पण मतदारांनाही या निमित्ताने अग्निदिव्य साकारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधानांचे कालचे आवाहनही अतिशय बोलके आहे. एकवेळ सुट्‌टी काढा, पण मतदान अवश्य करा, हे या देशातील तमाम मतदारांना सांगताना, त्यांच्या कर्तव्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आहे. हे कर्तव्य अधिक जबाबदारीने बजावण्याच्या अपेक्षेचा मथितार्थ त्यामागे आहेच. ज्या तर्‍हेने भाजपाविरोधकांनी मागील कालावधीत अकांडतांडव चालवले आहे, राहुलपासून राजपर्यंत सारी मंडळी ज्या पद्धतीने पातळी सोडून मैदानात उतरली आहे, ते बघता आता खरी कसोटी मतदारांची असणार आहे, हेच खरे!
 
ज्यांना कालपर्यंत भाजपाच्या सावलीलाही उभे राहणे पसंत नव्हते, राजकीयदृष्ट्या ते आपल्या फायद्याचे नसल्याचे ज्यांचा आजपर्यंत कयास होता, जे परवापरवापर्यंत भारतीय जनता पक्षाला हिणवण्यात धन्यता मानत होते, त्या तमामजनांना आता भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची उपरती होणे, हा काळाचा महिमा आहे. हा मतदारांनी सिद्ध केलेल्या त्यांच्या ताकदीचाही परिपाक आहे. ऐन निवडणुकीच्या मुहूर्तावर हार्दिक पटेलला कॉंग्रेसमध्ये जावेसे वाटणे अन्‌ विखे पाटलांना भाजपात प्रवेश करावासा वाटणे, याला स्वतंत्र संदर्भ आहेत. निवडणुकीच्या तोंडावरचे हे राजकीय प्रयोग तसे नवे नाहीत आपल्या देशातील राजकीय व्यवस्थेत. विखे पाटलांच्या पोराने कॉंग्रेस पक्षाला झिडकारून भारतीय जनता पक्ष जवळ करण्याची सल एव्हाना कॉंग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या तोंडून व्यक्त होऊ लागली आहे. बाळासाहेब थोरातांचा थयथयाट, त्यांनी केलेली विखे पाटलांची संभावना, या सार्‍याच बाबी राजकारणाच्या सारिपाटावरच्या सोंगाट्या ठरणार आहेत. पुढील काळात आणखी काही राजकीय भूकंपांची शक्यता या क्षेत्रातले निरीक्षक नोंदवीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘तयार राहणे’, एवढेच मतदारांच्या हातात असणार आहे.
 
दिवसागणिक सत्तेतून हद्दपार होत चाललेल्या कॉंग्रेसचे घर पुढील काळात अधिकाधिक रिकामे होत जाणार आहे. ज्यांना केवळ सत्तेसाठीच राजकारण करायचे आहे, त्यांनी अशा ‘भविष्य नसलेल्या’ राजकीय पक्षाच्या दिमतीला उभे राहण्याचे कारणच नाही. त्यांनी तो पक्ष सोडण्याचा अर्थही पुरेसा स्पष्ट आहे. भाजपाचे उज्ज्वल राजकीय भवितव्य त्यातून अधोरेखित होते, हे तर शंभर टक्के खरे! फक्त अशा संधिसाधूंना थारा कितपत द्यायचा, याची सीमा मात्र आता भाजपाला आखून घ्यावी लागणार आहे. एकूण, या घटनाक्रमाचे संकेत भाजपाच्या विजयनिश्चितीचे आहेत...