२६/११ नंतर कारवाई व्हायला हवी होती-निर्मला सीतारामन्‌
   दिनांक :14-Mar-2019
नवी दिल्ली, 
 मुंबईलवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपुआ सरकारने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी कारवाई करणे आवश्यक होते, पण सरकार गप्प राहिले आणि म्हणून अतिरेकी व त्यांच्या पाठिराख्यांची  हिंमत वाढली, अशी स्पष्ट भूमिका संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी आज व्यक्त केली.
 
 
 
दिल्ली भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच दहशतवादावर कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवाद आणि त्याला खतपाणी घालणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी वारंवार सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असे सीतारामन्‌ यांनी सांगितले.
 
मुंबईवर सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला झाला. लष्कर-ए-तोयबाचा या हल्ल्यात हात होता आणि पाकिस्तानच्या भूमीतच हल्ल्याचा कट शिजला, ही कबुली या प्रकरणी जिवंत अटक करण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबने दिली होती. त्यावेळी संपुआ सरकारने पाकिस्तानात घुसून तोयबाच्या अड्‌ड्यांवर कारवाई केली असती, तर भारतात उरी आणि पुलवामासारखे हल्ले झालेच नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.