अमेरिकेचा चीनला कडक इशारा; इतर मार्गांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही
   दिनांक :14-Mar-2019
वॉशिंग्टन:
 जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून चीनने वाचवले आहे. चीनने वीटोचा वापर केल्याने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.  आता अमेरिकेने चीनला कडक शब्दात इशारा दिला आहे. चीनच्या अशा धोरणाने संयुक्त राष्ट्रातील इतर सदस्य देशांना इतर पर्यायांचा वापर करावा लागेल. जर चीन दहशतवादासंदर्भात गंभीर असेल, तर त्याने पाकिस्तान आणि इतर देशांतील दहशतवाद्यांचा बचाव करू नये. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यानुसार, चीनने चौथ्यांदा असे केले आहे. चीनने सुरक्षा परिषदेच्या प्रक्रियेत अडचणी आणणं योग्य नाही. चीन असाच वारंवार दहशतवादावर कारवाई करण्यापासून इतर देशांना रोखत राहिल्यास सुरक्षा परिषदेकडे इतर मार्गांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

 
मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र चीनने  नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरविण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.