आमदार दत्तक गाव उमरी मेघेची निवडणूक अविरोध
   दिनांक :14-Mar-2019
- गावकऱ्यांनी ठेवला नवीन आदर्श
 

 
 
वर्धा,
गाव करी ते राव न करी ही म्हण प्रचलित आहे. असाच आदर्श शहरालगत असलेल्या उमरी मेघे येथील नागरिकांनी निर्माण केला. आमदार दत्तक गाव योजनेत समाविष्ट असलेल्या उमरी गावाने ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करीत आम्ही आदर्श आहोत असा संदेश सर्वाना दिला आहे. २४ मार्च रोजी जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. त्यामध्ये वर्धा तालुक्यातील उमरी मेघे गावाचा सुद्धा समावेश होता. वर्धा शहरालगत असलेल्या ११ गावांपैकी उमरी एक मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे येथील निवडणुकीकडे राजकीय पक्ष व राजकारण्यांचे लक्ष लागले होते. मात्र, गावातील नेते सचिन खोसे यांनी पुढाकार घेत यावेळी निवडणूक अविरोध करण्याचा चंग बांधला.
 
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी त्यांच्या प्रयत्नाला पाठिंबा दिला. आमदार दत्तक गाव योजनेत गावाचा समावेश झाल्याने अनेक विकासाची कामे गावात झाली आहेत व अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे. ११ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये ११ च नामांकन दाखल झाल्याने गावाची निवडणूक अविरोध झाली. सरपंच पदासाठी सौ. नंदा संजय उघडे यांचे एकमात्र नामांकन दाखल झाले होते, तसेच ११ सदस्यपदासाठी ११ च अर्ज असल्याने सर्व सदस्य अविरोध निवडून आले. तालुक्यातुन संपूर्ण ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध होणारी उमरी एकमेव ग्रामपंचायत आहे.उमरीच्या नागरिकांनी गावच्या इतिहासात प्रथमच अविरोध निवडणूक घड़वून आणली आहे. सर्वच गावांनी असा प्रयत्न केला तर गाव व जिल्हा सुद्धा आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही. एकीतुनच गावाचा खरा विकास साधता येतो,अशी प्रतिक्रिया गावक-यांनी व्यक्त केली आहे.