फेडरर, नदालची विजयी घोडदौड कायम
   दिनांक :14-Mar-2019
             
 इंडियन वेल्स स्पर्धेची गाठली उपांत्यपूर्व फेरी
इंडियन वेल्स: माजी विजेता रॉजर फेडरर आणि दिग्गज राफेल नदाल यांनी चौथ्या फेरीतील सामन्यात बाजी मारीत एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
 

 
 
 
त्यांच्या या यशामुळे आणि पुढील अडथळाही दोघांनी पार केला तर या दोन्ही दिग्गज टेनिसपटूंची गाठ उपांत्य फेरीत पडण्याची शक्यता आहे. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या नदालने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेल्या सर्बियाच्या फिलिप क्रॅजिनोविच याला एक तास २६ मिनिटांच्या संघर्षानंतर ६-३, ६-४ असे सहज पराभूत केले आणि अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित केला. कॅलिफोर्नियात विक्रमी सहाव्या जेतेपदाकडे लक्ष लागलेल्या व त्यासाठी प्रयत्नरत असलेल्या फेडररने ब्रिटनच्या कायले एडमंड याचे आव्हान अवघ्या ६४ मिनिटांत ६-१, ६-४ असे लिलया मोडून काढले. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आता फेडररला ३२ वर्षीय पॉल हबर्ट हुर्कास्ज याचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे.
 
नदालने याआधी २००७, २००८ आणि २०१३ साली या इंडियन वेल्स स्पर्धेचे जेतेपद हस्तगत केले होते. आता त्यालाही उपांत्य फेरी गाठण्यासाठी १३ वे मानांकन असलेल्या रशियाचा टेनिसपटू करेन खाचानोव्ह याचा अडसर दूर करावा लागणार आहे. या खाचानोव्हने उपांत्यपूर्व फेरी गाठताना जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या जॉन इस्नरला ६-४, ७-६ असे नमविले.