कचरा कंटेनरने चिमुरडीला चिरडले
   दिनांक :14-Mar-2019
- बडनेरा नवी वस्तीतली घटना
 
अमरावती,
महापालिकेच्या कचरा कंटेनर वाहनाने दोन वर्षांच्या चिमुकलीला चिरडल्याने ती जागीच ठार झाली. बडनेरा नवी वस्ती प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत येणाऱ्या मिलचाळ परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. नाहीद फिरदोस असे मृत मुलीचे नाव आहे.
 
 
 
अमरावती महापालिकेने आठ दिवसांपासून शहराच्या विविध भागात नागरिकांच्या घरातील कचरा नेण्यासाठी नव्याने कंटेनरची व्यवस्था केली आहे. या कचरा कंटेनरवर ध्वनिक्षेपकाद्वारे स्वच्छ भारत अभियान जनजागृतीबाबत कर्कश आवाजात गाणे वाजविण्यात येते. आज दुपारी बडनेरा नवी वस्ती प्रभागात मिलचाळ परिसरात कर्कश आवाजातील ध्वनिक्षेप सुरू करून कचरा कंटेनर जात असताना रस्त्यात खेळत असणाऱ्या नाहीद फिरदोस या चिमुकलीच्या अंगावरून कंटेनरचे पुढचे आणि मागचे चाक गेले.
 
यावेळी परिसरातील नागरिकांनी गाडीसमोर मुलगी खेळत असल्याबाबत चालकाला ओरडून सांगितले. मात्र, ध्वनिक्षेपकावर वाजणाऱ्या गाण्यामुळे चालकास काहीही ऐकू आले नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. परिसरातील नागरिकांनी चिमुकलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणात बडनेरा पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.