मोबाईलवर पब्जी खेळणे पडले महाग; १० जणांना अटक
   दिनांक :14-Mar-2019
पोकेमॉन गो आणि ब्लु वेल सारख्या ऑनलाईन गेमने अनेकांना वेड लावले आहे. तसेच पबजी या गेममुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे समोर येत असतानाच गुजरातमधील राजकोट शहरात पबजी गेमवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.
 
‘प्लेयर्स अननोन बॅटलग्राऊंड’ अर्थात पबजी हा ऑनलाइन गेम पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे.. “पबजी खेळाक्षरश: वेड लावले आहे. या पार्श्वभूमीमुळे तरुणांमध्ये हिंसक वृत्ती वाढत आहे. याशिवाय या गेममुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम होत आहे. सामाजिक सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पबजी गेमवर बंदी घालण्यात येत आहे”, असे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ आणि कलम ३७ (३) अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.
आता राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्तापर्यंत १० जणांना अटक केली आहे. या गुन्ह्याचे स्वरुप पाहता संबंधित तरुणांची तातडीने जामिनावर सुटका होते. यानंतर कोर्टात हे प्रकरण जाते आणि तिथे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुनावणी होते, असे पोलिसांनी सांगितले.