कारंजा नगर परिषदेतील कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन
   दिनांक :14-Mar-2019
-शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍या नगरसेवकावर कारवाई करा
 
 
 
कारंजा लाड, 
शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍या नगरसेवकावर कारवाईच्या मागणीसाठी नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी आज १४ मार्च रोजी कामबंद आंदोलन पुकारले. या संदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानूसार कारंजा नगर परिषदेचे सदस्य तथा माजी उपाध्यक्ष एम. टी. खान यांनी बुधवारी (१३ मार्च)  न. प. कार्यालयात येऊन कार्यरत स्थापत्य अभियंता प्रविण मोहेकर यांच्यासोबत असभ्य भाषेत शिवीगाळ करून गैरवर्तन केले. तसेच त्यांच्या खिशात पैसे कोंबण्याचा प्रयत्न केला. शिवाय धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेची कार्यरत कर्मचार्‍यांनी धास्ती घेतली आहे.
 
यापूर्वी देखील अनेकदा नगरसेवकांकडून कार्यालयात असे प्रकार घडले आहे. त्यामुळे नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना कारंजा यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात येऊन सदर न. प. सदस्याविरूध्द कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदर घटनेबाबत जिल्हाधिकारी वाशीम, जिल्हा पोलिस अधीक्षक वाशीम यांना सुध्दा माहिती देण्यात आली असून, संघटनेच्या वतीने योग्य कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.