अमेरिका भारतात उभाणार सहा अणुऊर्जा प्रकल्प
   दिनांक :14-Mar-2019
द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत होणार
 
वॉशिंग्टन:
 द्विपक्षीय सुरक्षा आणि नागरी अणु सहकार्य आणखी मजबूत करण्याचा भाग म्हणून भारतात सहा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची घोषणा अमेरिकेने आज गुरुवारी केली.
 
 
 
भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक सुरक्षा चर्चेच्या नवव्या फेरीनंतर दोन्ही देशांनी याबाबतचे संयुक्त निवेदन जारी केले. परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले आणि अॅण्ड्रा थॉम्पसन यांच्यात बुधवारी ही चर्चा झाली.
 
या चर्चेत द्विपक्षीय संबंध अधिकाधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. भारतात सहा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला, असे या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
 
भारत आणि अमेरिका यांच्यात ऑक्टोबर २००८ मध्ये अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्याचा करार झाला होता. आजच्या निर्णयामुळे हे संबंध आणखी मजबूत होणार असल्याची माहिती गोखले यांनी दिली. विशेष म्हणजे, अणुपुरवठादार गटात (एनएसजी) भारताला अद्याप स्थान मिळाले नसले, तरी या गटाने अनेक देशांसोबत याबाबतचे करार करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर भारताने अमेरिका, फ्रान्स , रशिया, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, ब्रिटन, जपान, व्हिएतनाम, बांगलादेश, कझाकस्तान आणि दक्षिण कोरिया यासारख्या  देशांसोबत अणुऊर्जा करार केलेला आहे.