राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुळे, तटकरे, उदयनराजे आणि परांजपे
   दिनांक :14-Mar-2019
मुंबई,
काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, रायगडमधून सुनील तटकरे आणि ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र माढा, मावळ आणि नगरमधील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली नाही, त्यामुळे या जागांबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
 
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज १२ जागांवरील उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. त्यात बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, रायगडमधून सुनील तटकरे, परभणीतून राजेश विटेकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे, जळगावमधून गुलाबराव देवकर, बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे आणि लक्षद्वीपमधून मोहम्मद फैजल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. उरलेल्या जागांवरील उमेदवारांची नावं उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचे उमेदवार
- बारामती: सुप्रिया सुळे,
- सातारा: उदयनराजे भोसले,
- कोल्हापूर: धनंजय महाडिक,
- रायगड: सुनील तटकरे,
- परभणी: राजेश विटेकर,
- मुंबई उत्तर पूर्व: संजय दिना पाटील,
- कल्याण: बाबाजी पाटील,
- ठाणे: आनंद परांजपे,
- जळगाव: गुलाबराव देवकर,
- बुलडाणा: राजेंद्र शिंगणे
- लक्षद्वीप: मोहम्मद फैजल
- हातकणंगले: स्वाभिमानी शेतकरी संघटना