पवारांचे माझ्या वडिलांबद्दलचे विधान दुर्दैवी : राधाकृष्ण विखे पाटील
   दिनांक :14-Mar-2019
मुंबई,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल केलेल विधान अतिशय दुर्दैवी आहे. यामुळे मला व्यक्तीशः दुःख झाले आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पुत्र सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते पहिल्यांदाच पत्रकारपरिषदेत संबोधित करत होते.
 
 
शरद पवार यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी असणाऱ्या जुन्या वादाचा उल्लेख केला होता. या वक्तव्याचे मला दुःख झाले आहे. त्यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने असे वक्तव्य करायला नको होते. त्यांनी आघाडीचा धर्म पाळायला हवा होता, असे विखे पाटील म्हणाले.
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन वेळा पराभव झाला. ही जागा काँग्रेसला सोडायला हवी होती. पवारांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. आपल्या आजोबांबद्दल पवारांनी असे वक्तव्य केल्याने सुजय यांनी पक्ष सोडला, असे विखे म्हणाले. मी सर्व वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींसमोर ठेवणार आहे. त्यानंतर पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात मी प्रचार करणार नाही, असे विखे यांनी स्पष्ट केले आहे.