पराभवामुळे निराश झालो नाही : कोहली
   दिनांक :14-Mar-2019
नवी दिल्ली:  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेतील पराभवामुळे अजीबात निराश झालेलो नाही. 30 मे पासून इंग्लंडच्या यजमानपदाखाली सुरू होणार्‍या क्रिकेटच्या महाकुंभामध्ये सहभागी होणार्‍या भारतीय संघातील अंतिम अकरा खेळाडूंची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. या निवडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने केले.
 


 
 
या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने आम्ही जिंकले होते. या मालिकेतील सामन्यात आम्ही फलंदाजीच्या क्रमात बदल करून बघितला, एवढेच नव्हे तर अनुभवी महेंद्रिंसह धोनी याला विश्रांतीही दिली, असे सांगून कोहली म्हणाला की, आमचा संघ संतुलित आहे.
 
मालिकेतील पाचव्या व शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कोहली म्हणाला की, आम्ही शेवटच्या तीन सामन्यांत काही खेळाडूंना संधी दिली. जबाबदारी आल्यानंतर त्यातून ते कसा मार्ग काढतात हे आम्हाला बघायचे होते. मात्र, पराभवासाठी अशी कारणे देणे योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे. कारण, जो भारताकडून खेळतो त्याच्याकडून चांगल्याच कामगिरीची अपेक्षा केली जात असते.
 
आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा अंतिम अकरा खेळाडू कोणते असतील, हे निश्चित करण्यात आले आहेत. परिस्थितीनुरुप त्यात एक िंकवा दोन बदल केले जाण्याची शक्यता आहे. सध्या एका जागेबाबत थोडी चर्चा सुरू आहे. मात्र, आमचा संघ संतुलित आहे, असेही कोहली म्हणाला. हार्दिक पंड्या परतल्यानंतर अनेक पर्याय खुले होणार आहेत आणि संघ आणखीच संतुलित होईल, अशी अपेक्षाही कर्णधाराने व्यक्त केली. जखमी झाल्यामुळे पंड्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील पाचही सामन्यांना मुकावे लागले होते.