यांचं एकत्रीकरण टाळा
   दिनांक :15-Mar-2019
<>  तंत्र डाएटचं
 
आहाराचा आरोग्यदायी पर्याय म्हणून आपण फ्रूट प्लेटचा पर्याय निवडतो. फ्रूट प्लेटमध्ये विविध गुणधर्मांची फळं असतात. सॅलडमध्येही वेगवेगळ्या गुणधर्माच्या फळभाज्या एकत्र खाल्ल्या जातात. पण विशिष्ट फळं एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेच्या तक्रारी उद्भवू शकतात. काही फळांमध्ये आम्ल असतं तर काही फळं गोड असतात. काही फळांमध्ये इतर गुणधर्म असतात. त्यामुळे प्रत्येक फळाची त्याच्या गुणानुसार विभागणी केली पाहिजे तसंच सॅलड खाताना विशेष काळजी घेतली पाहिजे. फळं आणि भाज्या एकत्र खाऊ नयेत तसंच विशिष्ट प्रकारची फळं एकत्र खाऊ नयेत.

 

  • कलिंगड, टरबूज इतर फळांसोबत खाल्ल्याने व्यवस्थित पचन होत नाही. या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याने ती झटपट पचतात. पण इतर फळांमधील पोषणमूल्यं शरीराला मिळत नाहीत. आम्लयुक्त आणि गोड फळांचं कॉम्बिनेशन टाळा. द्राक्षं, स्ट्रॉबेरी, सफरचंद, डाळिंब, पिच आदी फळं केळं आणि बेदाण्यांसोबत खाऊ नका. फेरू आणि केळं एकत्र खाऊ नये. यामुळे मळमळणं, डोकेदुखी, आम्लपित्ता सारख्या समस्या निर्माण होतात.
  • भाज्यांच्या तुलनेत फळं लवकर पचतात. पोटात जाईपर्यंत फळं जवळपास पचलेली असतात तर भाज्या पचायला काही काळ जावा लागतो. फळांमधल्या साखरेमुळे भाज्यांच्या पचनात बाधा येते. संत्रं आणि गाजर एकत्र खाऊ नये. यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
  • कमी पिकलेल्या केळ्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण बरंच जास्त असतं. तसंच बटाटा, रताळी, चवळी, छोले यांसारख्या पदार्थांमध्ये स्टार्च अधिक प्रमाणात असतो. अधिक स्टार्चयुक्त पदार्थांसोबत प्रथिनयुक्त पदार्थ खाऊ नये. बेदाणे, पेरू, पालक आणि ब्रोकोलीसारख्या पदार्थांमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. प्रथिनांचं पचन होण्यासाठी आम्लाची गरज असते तर स्टार्चच्या पचनासाठी अल्कलींची गरज पडते. प्रथिनं आणि स्टार्च यांच्या एकत्रीकरणाने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
  • अतिरिक्त प्रथिनांचं सेवन केलं असेल तर दुसर्‍या दिवशी पपई खा. यातल्या पेपेनमुळे प्रथिनाच्या पचनाची प्रक्रिया सुलभ होते. आहारात अधिक प्रमाणात मीठ खाल्लं असेल तर किंलगडासारखी फळं खावीत. शरीरातलं अतिरिक्त मीठ मूत्रावाटे बाहेर पडेल.