व्यायामात खंड नको
   दिनांक :15-Mar-2019
 नवसंशोधन 
 
व्यायामातून घेतलेला छोटासा ब्रेकही आपल्याला महाग पडू शकतो. दररोजच्या व्यायामाचा कंटाळा आला किंवा काही कारणांमुळे व्यायानात खंड पडला तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. व्यायामातून घेतलेल्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीमुळे बीएमआय कमी होणं, चयापचय क्रिया मंदावणं आददी समस्या निर्माण होतात. टाईप २ डायबिटिस, हृदयविकार, उच्च रक्तदाबासारखे विकारही जडू शकतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. नियमित व्यायाम करणार्‍या तंदुरुस्त प्रौढांनी अवघे १४ दिवस व्यायाम केला नाही तर स्थूलता वाढण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते, असंही या संशोधनातून समोर आलं आहे. यामुळे वेळेआधीच मृत्यूही येऊ शकतो.
 
 
 
या संशोधनात बैठ्या, आरामदायी जीवनशैलीचे दुष्परिणाम समोर आले आहेत. शारीरिकदृष्ट्‌या कार्यरत असणं किती गरजेचं आहे हे यातून दाखवून देण्याचा प्रयत्न असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. ब्रिटनमधल्या लिव्हरपूल विद्यापीठात याबाबत संशोधन करण्यात आलं. या संशोधनात २८ तंदुरुस्त तरूणांचा अभ्यास करण्यात आला. या तरूणांचं वय अवघं २५ वर्षांचं होतं. शरीराला १४ दिवस आराम दिल्यानंतर विविध विकार विकसित होण्याचं प्रमाण किती वाढतं, याबाबतची निरीक्षणं यातून नोंदवण्यात आली. १४ दिवसांनंतर शरीरात बरेच बदल होत असल्याचं यातून लक्षात आलं. यामुळे शरीरातल्या फॅट्‌सचं प्रमाण वाढलं. हे फॅट्‌स शरीराच्या मध्यभागी साचू लागतात. यामुळे डायबिटिससारखे विकार जडण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. हृदयाची कार्यक्षमता कमी होते, असंही यात लक्षात आलं. त्यामुळे व्यायाम आणि शारीरिक हालचाल करणं गरजेचं आहे याची नोंद घ्यावी.