कॉंग्रेसमधील गटबाजी वाढवणार युतीचे मताधिक्य
   दिनांक :15-Mar-2019
 - अनिरुद्ध पांडे 
यवतमाळ,  
२०१९ ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली. कॉंग्रेस आणि भाजपा-शिवसेना युती यांचे उमेदवार कोण हेही लोकांना कळले. कॉंग्रेसतर्फे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली. विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा झाली नसली तरी ‘विद्यमान’ असल्यामुळे आणि स्पर्धेत दुसरे कोणी नसल्यामुळे त्यांचीच उमेदवारी ‘फायनल’ मानली जाते. शिवसेनेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्वत:च मध्यंतरी लोकसभा लढवण्याचे संकेत दिले होते. पण भावना गवळी आणि त्यांच्यामधील वाद हेच त्याचे कारण असावे असे जाणवले होते. आता शिवसेनेतील गटबाजीवर पडदा पडला असून आपोआच राठोड यांचा दावा मागे पडला आहे. स्वाभाविकच गवळी यांना पुढे चाल मिळणार हे नक्की आहे.
 
 
 
शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन नेते, संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यात जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेली गटबाजी, काटेबाजी मध्यंतरी एकमेकांना निवडणुकीत पाहून घेऊ, या पातळीवर उतरली होती. गवळी यांच्या खासदार क्षेत्रातील एकूण सहा विधानसभा क्षेत्रांपैकी दिग्रस या एकाच क्षेत्राचे प्रतिनिधीत्व राठोड करतात. पण त्यांच्या बंजारा समाजाचा प्रभाव संपूर्ण मतदारसंघातच विखुरलेला आहे. नुकतेच त्यांनी पोहरादेवी येथील एका भव्य आयोजनाच्या निमित्ताने मोठी जबाबदारी स्वत:कडे घेऊन ती यशस्वी पार पाडली होती. या बंजारा समाज मेळाव्यानंतर खरे ‘बंजारा नायक’ संजय राठोडच अशी प्रतिमा त्यांनी मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर मनोमिलन झाले नसते तर भावनाताईंसाठी संजयभाऊ उपद्रवी ठरू शकले असते. भाजपासोबत युती झाली नसती तर हा उपद्रव अधिक प्रभावी ठरू शकला असता. पण युती झाली, मनोमिलन झाले, भावना गवळी नशीबवान ठरल्या.
 
 
 
भावना गवळी गेल्या दहा वर्षांपासून यवतमाळ-वाशीमच्या खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत. दोन्ही वेळी, आणि त्यापूर्वीही वाशीमच्या खासदार म्हणून दोन वेळा त्या निवडून आल्या आहेत. या लागोपाठच्या चारही विजयांत त्या भाजपा-शिवसेना युतीच्याच उमेदवार होत्या. स्वाभाविकपणेच त्यांच्या विजयात भाजपा कार्यकर्त्यांचाही मोठा वाटा आहे. पण निवडून आल्यानंतर या ताईंकडून भाजपावाल्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही अशी तक्रार आहे. भाजपाचे विकास प्रस्ताव, खासदार निधी या संदर्भात त्या दुर्लक्षच करतात असेही भाजपा पदाधिकारी उघडपणे सांगतात. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही भावना गवळी यांच्याशी फारसा सुसंवाद नसल्याचे बोलून दाखवतात. या सार्‍याच बाबी यावेळी गवळी यांच्यासाठी तापदायक ठरू शकल्या असत्या, पण युती झाल्यामुळे त्यांचे नशीब लागोपाठ पाचव्यांदा फळफळण्याच्या मार्गावर आहे.
 
दुसरीकडे भाजपा-शिवसेनेच्या स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी आहे. या आघाडीतून जुन्याच समीकरणांप्रमाणे ही जागा राष्ट्रीय कॉंग्रेसकडे गेली आहे. या कॉंग्रेसने माणिकराव ठाकरे या प्रबळ उमेदवाराला उमेदवारी जाहीर केली आहे. माजी राज्यमंत्री, माजी विधान परिषद उपसभापती, माजी आमदार, माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशी बिरुदावली मिरवणारे माणिकराव सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्वात प्रभावी नेते आहेत. त्यांचे सुपुत्र, युवक कॉंग्रेसचे लोकसभा क्षेत्र प्रमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे हेही युवकांमधील कॉंग्रेसचे जिल्ह्यातील सर्वात प्रभावी नेते आहेत. पुत्राची युवकांमधील ताकद हीसुद्धा माणिकराव ठाकरे यांची जमेची बाजू आहे, पण ती इतर कॉंग्रेसवाल्यांच्या तुलनेत.
 
मुळात कॉंग्रेसचीच किती ताकद जिल्ह्यात शिल्लक आहे हाच चर्चेचा विषय आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने यवतमाळ जिल्ह्याला ‘कॉंग्रेसमुक्त’ केले आहे. त्यात कॉंग्रेसमधील गटबाजी हा चिंतेचा विषय आहेच. सत्ता उपभोगत असताना कॉंग्रेसमधील गटबाजी जरा शांत असते. पण सत्ता नसताना, रिकाम्या नेत्या, कार्यकर्त्यांच्या गटबाजीला ऊत येत असतो. विशेष म्हणजे गटबाजीला माणिकराव ठाकरे यांच्याकडून नेहमीच प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल माणिकराव ठाकरे यवतमाळमध्ये चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेले होते. माणिकरावांचे प्रवीण देशमुखांसारखे कार्यकर्ते त्यांच्या प्रभावक्षेत्रात प्रा. वसंत पुरकेंसारख्या उमेदवाराच्या पाडापाडीचे कारस्थान करत असतात.
 
या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशीमची उमेदवारी मिळवण्यासाठी माणिकराव ठाकरे यांच्यासह शिवाजीराव मोघे, जीवन देवराव पाटील, डॉ. टी. सी. राठोड आणि डॉ. महंमद नदीम प्रयत्नशील होते. माणिकराव ठाकरे वगळता कॉंग्रेसमधील सर्वच गट यापैकी कोणाचीही उमेदवारी उचलून धरण्यात आघाडीवर होते. ठाकरेंचे घोडे शर्यतीत समोर सरकत आहे असे लक्षात येताच या चारही इच्छुकांनी एकत्र येऊन आम्हा चौघांपैकी कोणीही चालेल, पण ठाकरे नकोत अशी भूमिका ‘हायकमांड’जवळ घेतल्याचे सांगतात. अशी त्यांची भूमिका असल्यास आता माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी मिळाल्यावर वेगळे काही घडण्याची अपेक्षा कॉंग्रेसवालेही करत नाहीत.
 
इकडे शिवसेनेला उमेदवारी मिळाल्यानंतरही भाजपवाल्यांना नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी भावना गवळींनाच निवडून आणायचे आहे. तर तिकडे कॉंग्रेसला कोणाचे हात बळकट करायचे नाहीत, की राष्ट्रवादी कॉंग्रेसवाल्यांनाही माणिकराव ठाकरेंना निवडून आणायचे नाही आहे. कॉंग्रेससाठी इकडून तिकडून सारे गणित वजाबाकीचेच होते आहे.