आपले ‘खास’दार...
   दिनांक :15-Mar-2019
द. वा. आंबुलकर
 
सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वीचा काळ. त्या वेळी गावकीच्या सार्वजनिक ठिकाणी वा चावडीवर असणार्‍या मातीच्या- कुडाच्या भिंतीवर पांढर्‍या चुन्याने व मोठ्या ठळकपणे ‘देवीचा रोगी कळवा व १००० रु. मिळवा!’ (त्या काळी हजाराला हजारो रुपयांची किंमत होती महाराजा!) असे लिहिलेले आढळून येई. त्यानंतर ‘देवी’ची जागा ‘नारू’ने घेतली व ‘नारूचा रोगी दाखवा व १००० रु. मिळवा!’ अशा घोषणा गावाच्या भिंतींवर रंगविलेल्या दिसू लागल्या.
 
प्रत्यक्षात किती जणांना वर नमूद केलेली सरकारी रक्कम मिळाली, हा वादाचा मुद्दा असला, तरी दरम्यानच्या काळात एखादी बाब दाखवून काही रक्कम मिळविणे, हा मुद्दा सर्वमान्य ठरला. प्रसंगी त्याला काही प्रमाणात राजकीय स्वरूपाची खोचक डूबपण मिळत गेली व त्यातूनच एखादा नेता-पुढारी, खासदार-आमदार त्याच्या संबंधित मतदारसंघात फार दिवसांपासून न आढळल्यास ‘आमचा खासदार-आमदार दाखवा व १००० रु. मिळवा’ अशा घोषणा राजकीय उपहासासह लिहिल्या-बोलल्या जाऊ लागल्या व त्यांचा आपापल्यापरी परिणामपण दिसू लागला.
 
 
 
आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात निवडून आल्यावर सभागृहात वा समागृहाबाहेर काय करतात, कितपत सक्रिय असतात व सर्वसामान्य जनतेसाठी काय करतात, याची उत्सुकता सर्वांना असते. तसे पाहता, आमदार-खासदार, लोकसभा वा विधानसभेत काय करतात, याचे दर्शन आपल्याला ‘दूरदर्शन’वरून दुरून का होईना, पण होतच असते. मात्र, लोकसभा-विधानसभा या सभागृहांच्या अधिवेशन काळाव्यतिरिक्त आपले ‘खास’दार काय ‘खास’ करतात, याचा माहितीसह तपशील माहितीच्या अधिकारांतर्गत उपलब्ध झाला असून, २६/११ ला मुंबईत झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या कालावधीतपण काही खासदार हॉटेल ताजमध्ये मुक्कामी असल्याचे आढळून आले होते व त्याचा तपशील खालीलप्रमाणे होता-
 
त्या वेळी माहिती अधिकारांतर्गत उठविण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात, लोकसभा सविचालयातर्फे करण्यात आलेल्या खुलाशात असे नमूद करण्यात आले होते की, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान चार खासदार हॉटेल ताजमध्ये मुक्कामी होते. या सर्वपक्षीय खासदारांमध्ये एन. एन. कृष्णदास (मार्क्सवादी), जयिंसगराव गायकवाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस), लालमणी प्रसाद (बहुजन समाज पक्ष) व भूपेंद्रिंसह सोळंकी (भाजपा) या खासदारांचा समावेश होता. हे खासदार १५ सदस्यीय खासदारांच्या विशेष समितीचे सदस्य म्हणून व हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनसह सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी आले होते, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.
 
हॉटेलचे आरक्षण अर्थातच हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे करण्यात आले होते व त्यानिमित्ताने त्या वेळी एक प्रश्नचिन्हपण निर्माण झाले होते. असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, प्रचलित सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून प्रवास वा निवास करताना खासदारांनी सरकारी अतिथिगृह वा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या गेस्ट हाऊसचा वापर करणे अपेक्षित असून, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे सरकारी अतिथिगृह वा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे गेस्ट हाऊस उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील हॉटेलचा उपयोग करण्यास हरकत नाही.
 
मात्र, २६/११ रोजी मुंबईवर भीषण स्वरूपाचा पाकी दहशतवादी हल्ला होत असताना काही खासदार मात्र ‘ताज’मुक्कामी होते. अलीगडच्या बिमल खेमानी यांनी हा मुद्दा माहितीच्या अधिकारांतर्गत लावून धरला व त्याद्वारे आणि त्या निमित्ताने एक ‘आम’ आदमी, ‘खास’ दारांची ते इतर वेळी व इतरत्र काय काय करतात, या संदर्भात हजेरी घेऊ शकतो, याचा कृतिशील वस्तुपाठपण सार्‍यांना करून दिला हे खास!