पोरं पळविणार्‍यांवर पाळत ठेवा!
   दिनांक :15-Mar-2019
ही तो रश्रींची इच्छा!
  - र. श्री. फडनाईक
 
सावधान! राज्यात मुले पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे! हा पोलिसांचा इशारा नाही. तसेही पोलिस एवढे दक्ष असतात का! ते तर घटनेनंतर येतात! त्यामुळेे जनप्रतिनिधींनाच याबाबत जागरुक राहावे लागते! ईश्वरकृपेने काही बाबतीत काही लोक-सेवक फार चौकस असतात, विशेषतः निवडणुकीच्या काळात! परवा परवापर्यंत पहुडलेला हा परमार्थी या पर्वातच कसा काय प्रकटला, असे असंबद्ध प्रश्न कुणी विचारू नये! प्रश्न तो नाहीच! प्रश्न आहे त्याच्या जनहिताच्या कळकळीचा!
 
तर झाले काय, की महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते, म्हणजेच विरोधकांचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला ! तो, त्यांनी स्वतःहून केला, असे जरी डॉ. सुजय सांगत असले, तरी सुजयला भाजपाने पळविले, असा राष्ट्रवादीच्या एका आमदाराला दाट संशय आहे.
 
 
 
विखे-पाटलांचा मुलगा डॉक्टर आहे, सुजाण आहे; तो आपल्या पित्याचा पक्ष सोडणार नाही, पित्याच्या उतार वयात त्यांना असं एकटं पाडणार नाही! निश्चितच त्याला (भाजपाच्या) मुलं पळविणार्‍या टोळीनं पळवलं; त्यासाठी त्याला चॉकलेट दाखविलं, खेळणी दाखविली, चल मेरे घोडे टिक्‌ टिक्‌ टिक्‌ टिक्‌ टिक्‌ टिक्‌ हे गाणं आळवलं! सुजय त्यावेळी बागेत कंचे खेळत होता! त्याचे वडील राधाकृष्ण कृष्णनीतीवरचा ग्रंथ वाचत होते. तरीपण त्यांचा एक डोळा सुजयकडे होताच! केव्हातरी त्यांना झपकी लागली अन्‌ भाजप टोळीने सुजयला पळविले! आम्ही हा घटनापट आमच्या चक्षूंसमोर आणला! आमदाराजवळ असलेल्या सीसीटीव्ही फितीत याशिवाय आणखी काही असेल, तर ते त्यांना माहीत!
 
भाजपा टोळीचे यानंतरचे लक्ष्य रणजितिंसह मोहिते पाटील हे मूल आहे, अशी माहितीही, मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याचा इशारा देणार्‍या आमदाराजवळ असेलच असेल! रणजित हा माढाचे विद्यमान खासदार विजयिंसह मोहिते पाटील यांचा मुलगा आहे. वयाने लहान असला तरी तो पतंग उडविण्यात आणि दुसर्‍याची पतंग काटण्यात पारंगत आहे. कॉंग्रेेस- राष्ट्रवादीची पतंग कापण्यात हा पोरगा आपल्या कामात येऊ शकतो, हे मुलं पळविणार्‍या टोळीनं हेरले आहे. तेव्हा विजयिंसहांनी या पोरावर पहारा ठेवावा! जागरुक आमदाराचा इशारा गांभीर्याने घ्यावा!
 
पवार घराण्याचा रोहित पवार हा मात्र या टोळीच्या जाळ्यात येणार नाही, हे त्याच्या एवढ्यातल्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे! पवार कुटुंबीयात कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही अभेद्य होतो, आहोत आणि राहू, असे रोहितने स्पष्ट केले आहे. आपल्या शरद आजोबांवर त्याचे प्रेम आहे. त्यामुळे भाजप टोळीने त्याला पळविण्याचा प्रयत्न करू नये, असे या टोळीला कोणीतरी सांगणे आवश्यक आहे. माढाची जागा आजोबांनी त्र्याग्याने नव्हे त्यागाच्या भावनेतून सोडली आहे, असे या यंग जनरेशनच्या प्रतिनिधीला म्हणायचे असेल, असाच अंदाज, या संदर्भात प्रकाशित झालेल्या वृत्तावरून काढता येईल! मी लोकसभेसाठी इच्छुकच नव्हतो, असेही या नातवाने स्पष्ट केले आहे.
 
मुलं पळविणारी ही टोळी वयस्कांच्याही मागे लागली असल्याचे आणखी एक वृत्त हाती आले आहे! त्या जागरुक आमदाराला हे कोणीतरी कळवायला हवे! पोरांबरोबर, त्यांच्या पिताश्रींवर, काकाश्रींवर, मामाश्रींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे! आजोबांवर, पणजोबांवरही नजर ठेवणे जरूर झाले आहे! अन्यथा नातू राहील बाजूला अन्‌ आजोबाच पळविले जातील! एक बरं आहे, की ही टोळी पोरीसोरींच्या वाटी जात नाही! अन्यथा कोणाकोणाला नजर-कैदेत ठेवणार हो!
 
मुंबईतील एका कॉंग्रेस आमदारालाही पळविण्याची योजना, पोरं पळविणार्‍या टोळीने आखली आहे, याचे काही पुरावे मीडियाच्या हाती आले आहेत. हा आमदार कॉंग्रेसचा असूनही त्याच्या कार्यालयाच्या फलकावर देवेंद्र फडणवीसांचा फोटो असल्याचे मीडियाला दिसले! मीडियाने यावर आश्चर्य व्यक्त केले, तेव्हा या आमदाराने मी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहे, असे स्पष्ट केल्याचे वृत्तही मीडियाने दिले आहे. या लोकांनी पोलिसांचा काम वाढविले आहे! पोलिसांनी कुठे कुठे चौक्या बसवाव्यात! पोरांकडे लक्ष केंद्रित केले, की बाप मागच्या दाराने पळविले जातात! बापांना सुरक्षा कवच दिले, की आजोबांना, व्हीलचेअरमधून दवाखान्यात नेण्याचा बहाणा करून थेट भगव्या महालात पळविले जाते! करायचे तरी काय? या टोळीला आवर घालायचा कसा? ‘जनहितार्थ’ काही तरी करायलाच पाहिजे! काहीच नाही, तर सारेच्या सारे पळविले जाईपर्यंत आणि त्यानंतरही ट्विट करत राहिलं पाहिजे! ‘मलाही पळविले हो,’ हा शेवटचा ट्विट आतापासूनच लिहून तयार ठेवला पाहिजे!