उचलली जीभ...!
   दिनांक :15-Mar-2019
शुभ बोल रे...
 
विनोद देशमुख
९८५०५८७६२२ 
 
निवडणुकीचे वातावरण जसजसे तापू लागले आहे, तसतसे नेटकरी आणि बोलघेवडे यांना चेव चढत आहे. तसे तर मोदी सत्तेवर आले तेव्हापासूनच गेली पाच वर्षे समाजमाध्यमांवर धमासान सुरू आहे. मोदींच्या चाहत्यांना अंधभक्त म्हणून हिणवले जात असले तरी, नेहरू-गांधी भक्त कमी आंधळे नाहीत! फेसबुक, व्हॉट्सॲप , ट्विटर हे याचे पुरावे आहेत. त्यावरील युद्ध आणि राजकीय आखाड्यातील लढाई यंदा टोकाला जाणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
 
यात सर्वाधिक स्वार्थ साधणार नेतेलोक! कारण, त्यांच्यासाठी निवडणूक म्हणजे धंदोपानी का सवाल ! त्यांचे भवितव्य पणास लागलेले असते. त्यामुळे ते विरोधकांवर त्वेषाने तुटून पडत असतात. आणि मग बोलण्याचे ताळतंत्र राहत नाही. याचा अनुभव आपण सारे घेतच आहोत. चौकीदार चोर है... हे त्याचे एक ठळक उदाहरण. मोदींचा द्वेष करताना देशाच्या निर्वाचित पंतप्रधानाला आपण शिवी देत आहोत, याचेही भान अनेक महाभागांना राहिलेले नाही. अशा बोलघेवड्यांचे अमाप पीक आता येऊ घातले आहे.
 

 
 
कॉंग्रेस-भाजपा-कॉंग्रेस अशी त्रिस्थळी यात्रा करणारे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील स्वनामधन्य लोकनेते नाना पटोले असेच बोलत सुटले आहेत. परवा ते म्हणाले- भाजपानेते गोपीनाथ मुंडे यांना संपवण्याचे काम रेशीमबागवाल्यांनी (संघ) केले आणि आता ते पंकजा मुंडे यांनाही संपवण्याच्या मागे आहेत. भाजपात खासदार राहूनही ज्याला संघ परिवार समजला नाही, त्याला काय म्हणायचे. की, नव्या मालकांना खुश करण्यासाठी काहीही बोलत राहायचे, असे ठरले आहे ?
 
प्रमोद महाजन यांच्या खालोखाल वट असलेले महाराष्ट्रातील भाजपानेते म्हणून मुंडे सर्वांना माहीत आहेत. त्यांची संपूर्ण राजकीय जडणघडण विद्यार्थीदशेपासून संघ परिवारात झाली. याच पक्षाने त्यांना मोठे केले, प्रतिष्ठित केले. त्यांनीही संघर्षयात्रा काढून आणि शरद पवारांसारख्या दिग्गजाशी पंगा घेऊन पक्ष वाढविला, व्यापक केला. दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला नसता तर तेच मुख्यमंत्री झाले असते, इतके सारे उघड आहे. असे असताना कोणीतरी ओढूनताणून काहीतरी बडबडतो, हे मुद्दाम संभ्रम पसरविण्यासाठीच केले जात आहे ना! ज्या नेत्याने संघ परिवाराची पाळेमुळे राज्यात दूरवर पोहोचविली, त्यालाच कमी लेखण्याचा निर्बुद्धपणा करणारे परिवार दुसरे आहेत! ते घराणेशाहीतील परिवार आहेत, ज्यांची हाजी हाजी नाना पटोलेंना आता करावी लागत आहे! त्यांनी ती जरूर करावी. पण इतरांवर बेताल आरोप करताना दहादा विचार करावा. आमदार-खासदार राहिलेल्याकडून तरी एवढी अपेक्षा निश्चितच राहणार.
 
पंकजा मुंडेंंचे चिक्की प्रकरण कोणी काढले आणि यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला, हे नानांना माहीत नाही काय? पंकजाची बहीण आणि मामेबहीण भाजपाच्या खासदार आहेत. हे संपवणे आहे की वाढवणे?
तोंडाला येईल ते बोलले म्हणजे खपून जाते, हा भ्रम फार काळ टिकत नाही भाऊ! खोटं बोल, पण रेटून बोल हे थांबवा आता! असा उमेदवार नागपुरात आयात होऊ घातला आहे. तेव्हा, नागपूरकरांनो, सावधान !!