दीपाच्या ‘कर्मा’मध्ये तेजाची ओवाळणी
   दिनांक :15-Mar-2019
आठवड्यातली स्त्री 
- मिलिंद महाजन  
 
२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्स प्रकारात दीपा कर्माकरने पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करणारी खेळाडू म्हणून इतिहास रचला. रशिया, अमेरिकासारख्या सराईत जिम्नॅस्टचे आव्हान स्वीकारत दीपाने प्रॉडुनोव्हासारख्या कठीण जिम्नॅस्टिक्स प्रकारात उत्तम प्रदर्शन केले. थोडक्यात तिचे पदक हुकले मात्र तिने समस्त जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील मातब्बरांनीही तिच्या प्रदर्शनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पाचवेळची ऑलिम्पिक विजेती रोमानियाची महान जिम्नॅस्ट नादिया कोमेनसी तर जणू दीपाच्या प्रेमातच पडली. दीपाने प्रॉडुनोव्हासारखा कठीण प्रकार केल्याचे बघून तीसुद्धा आश्चर्यचकित झाली. दीपाने ऑलिम्पिकपदक जिंकावे असे नादियाला मनोमन वाटते. दीपासारख्या जिम्नॅस्टने भारताला वेगळी ओळख निर्माण करून दिली. दीपामुळे भारतात प्रतिभावान खेळाडू निश्चितच उदयास येतील, असा विश्वास तिने व्यक्त केला.
 
 
 
 
या कर्तृत्वाबद्दल भारत सरकारने दीपा कर्माकरला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. मात्र रिओ ऑलिम्पिकनंतर सरावादरम्यान दीपाच्या बाबतीत अघटित घटना घडली आणि सरावादरम्यान दीपाच्या गुडघ्याला दुखापत झाली. २०१७ मध्ये तिला मुंबईत अँटेरियर क्रूसिएट लीगामेंट (एसीएल) शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे बरेच दिवस तिला जिम्नॅस्टिक्स सरावापासून दूर राहावे लागले होते व बर्‍याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकावेसुद्धा लागले होते. एका स्पर्धेत तिने भाग घेतलाही होता, परंतु पुन्हा गुडघ्यात वेदना होऊ लागल्या होत्या. तिची कारकीर्द धोक्यात येते की काय अशी भीती निर्माण झाली होती. तिने पुन्हा विश्रांती-उपचार घेतल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने सरावाला लागली. तिने गतवर्षी आशियाड क्रीडा स्पर्धेत भाग घेतला, परंतु अपेक्षेनुसार सरस प्रदर्शन करता आले नाही. तिला सहावे स्थान मिळाले.
 
दीपा म्हणजे हरिवंशराय बच्चन यांच्या कवितातील एका छोट्याशा मुंगीसारखी आहे. जी मुंगी दाणा घेऊन भींतीवर चढताना शंभरदा घसरते, परंतु तिच्यातील विश्वास कमी होत नाही व ती सतत प्रयत्न करते. अपयश यशाची पायरी आहे, अपयश एक आव्हान आहे, त्याचा स्वीकार करा. संघर्षाचे मैदान सोडून पळ काढू नका. कारण काही केल्याविना जयजयकार होत नाही. प्रयत्न करणार्‍यांचा पराभव होत नाही, अशा या प्रेरणादायी कवितेतील भावार्थ दीपा खर्‍या अर्थाने जगत आहे.
आता पुन्हा नव्या उत्साहाने दीपा कर्माकर आगामी दोन विश्वचषक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झालेली आहे. दीपा १४ मार्चपासून अझरबैजानच्या बाकु येथे होणार्‍या विश्व स्पर्धेत आपले कौशल्य दाखविणार आहे व त्यानंतर कतारच्या दोहा येथे आयोजित विश्व स्पर्धेतही नशिब अजमावणार आहे. दीपाच्या तेजोमय प्रदर्शनाने समस्त जगाचे डोळे दीपून जावो, हीच शुभेच्छा...