बांग्लादेश वि. न्यूझीलंड कसोटी सामना रद्द- न्यूझीलंड मशीद हल्ल्याचे पडसाद
   दिनांक :15-Mar-2019
ख्राइस्टचर्च,
साउथ आयलंडमधील ख्राइस्टचर्च शहरातील अल नूर आणि लिंगवूड मशिदीवर आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात ३०च्या आसपास लोक ठार झाले तर कित्येक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर ख्राइस्टचर्च शहरात शनिवारपासून न्यूझीलंड आणि बांग्लादेशमध्ये खेळला जाणारा सामना रद्द करण्यात आला आहे.

 
भारतीय वेळेनुसार आज सकाळी शहरातील 'अल नूर' मशिदीत अज्ञात इसमाने हल्ला केला. त्यावेळी या मशिदीत बांग्लादेशचा संपूर्ण संघ नमाजसाठी उपस्थित होता. सुदैवाने त्यांना मागच्या दाराने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जीव वाचवल्यासाठी बांग्लादेशच्या खेळाडूंनी स्थानिक सुरक्षारक्षकांचे आभारही मानले आहेत.
न्यूझीलंडच्या इतिहासातील हा पहिला दहशतवादी हल्ला आहे. स्थलांतरित मुसलमानांचे प्रमाण आणि युरोपची वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी हा हल्ला केल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड आणि बांग्लादेशमधील कसोटी सामना रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या हल्ल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.