चीनचा पुन्हा खोडा!
   दिनांक :15-Mar-2019
 
 
 
जैश-ए-मोहम्मद, हरकत-ए-मुजाहिदीन आणि हरकत-उल-अन्सार या दहशतवादी संघटनांचा संस्थापक... जगातील दहशतवादी संघटनांचा म्होरक्या... पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय असलेला... भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार... आणि पाकिस्तान व चीनच्या सहानुभूतीस पात्र ठरलेल्या 50 वर्षीय मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा चीनने हाणून पाडले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर मसूद अझहर हा पुन्हा एकदा भारताच्या रडावर आला होता. त्याच्या दहशतवादी कारवायांचे अनेक पुरावे भारताने जागतिक समुदायापुढे दिले आहेत. तरीदेखील पुलवामा हल्ल्याच्या या सूत्रधाराला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात यावे म्हणून भारताने केलेली शिष्टाई चीनने हाणून पाडली.
 

 
 
 पाकिस्तानसोबतची मैत्री आणि भारतासोबतचे वैर, या एकमेव कारणासाठी चीनने मसूद अझहर प्रकरणी पाकिस्तानवर येणारे बालंट दूर सारले. चीनने असा केलेला हा पहिलाच प्रकार नव्हे. मसूद अझहरला आतंकवादी घोषित करण्याचे प्रयत्न चौथ्यांदा फसले आहेत. 2009, 2016 आणि 2017 मध्ये या संदर्भातील प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर करत खोडा घातला होता. पठाणकोट हल्ल्यातील सहभागानंतर जागतिक दबावापोटी पाकने मसूदला नजरकैदेत ठेवले होते. पण, ही नजरकैद निव्वळ दाखवण्यासाठी होती, हे काही दिवसातच स्पष्ट झाले. पाकिस्तानने त्याची सुटका करून औदार्य दाखविले. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेला अझहर मसूद हा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी म्हणून गणला जातो. त्याला आंतरराष्ट्रीय
 
 दहशतवादी घोषित करावे म्हणून फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेनेही प्रयत्न केले. पण, चीन या बलाढ्य देशांनाही बधला नाही. त्याने संयुक्त राष्ट्रसंघात या प्रस्तावावर चर्चा होण्यापूर्वीच बीिंजगमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन भारताकडून अझहरबाबत आणखी पुराव्यांची मागणी केली. चीनने असे पुरावे मागण्यापूर्वी चीनला आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असून, याबाबतच्या ठरावावर होणार्‍या चर्चेत आपण सहभागी होणार असल्याचे जाहीर केले असले, तरी त्याची भूमिका दहशतवाद आटोक्यात आणण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना खोडा घालणारी आहे, हे निश्चित! भारताने केलेली मोर्चेबांधणी फसली असली, तरी हे प्रयत्न यापुढेही सुरू राहणार आहेत. जैशच्या मुसक्या बांधण्यासाठी भारताने काही या एकाच मंचाचा वापर केलेला नाही. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी भारताच्या लष्कराला खुली सूट देऊन पाकविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे भारतीय हवाईदलाने, हा हल्ला झाल्यानंतर तेराव्या दिवशी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्येच नव्हे, तर पाकिस्तानातील बालाकोट येथे विमाने घुसवून जैशचे अड्डे नामशेष केले. या हल्ल्यात जैशचे साडेतीनशेवर सक्रिय अतिरेकी, प्रशिक्षक ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
 
या सर्जिकल स्ट्राईकवर विरोधी पक्षांचा अजूनही विश्वास नाही, ते भारत सरकारकडे पुरावे मागत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या ज्वरामुळे त्यांना भारत सरकारला श्रेय देण्यात अडचण जात आहे, हे भारतीयांनीही ओळखून घ्यायला हवे. एकीकडे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खीळ बसल्याने भारत सरकार चिंतेत असताना, कॉंग्रेसला मात्र त्याचा आनंद झाला आहे. या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतावरच टीका साधण्याची संधी घेतली आहे. त्यामुळेच भाजपा आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात जुंपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिंपग यांना घाबरले. संयुक्त राष्ट्र संघात चीनने भारतविरोधी भूमिका घेऊनही मोदी एक शब्द उच्चारू शकले नाहीत, या शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर प्रहार केला आहे. राहुलच्या या ट्विटला भाजपानेदेखील प्रत्युत्तर दिले आहे- ‘‘तुमच्या आजोबांनी (पंडित नेहरू) चीनला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची जागा भेट दिली नसती, तर हा देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य राहिला नसता,’’ असे भाजपाने त्यांना सुनावले आहे आणि हे खरेही आहे. नेहरू-गांधी परिवाराने केलेल्या अनेक चुकांमुळे भारताला दहशतवादाच्या झळा बसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कोंडी होत आहे. काश्मीर प्रश्न ही कॉंग्रेसच्याच बोटचेप्या धोरणांची देण आहे. भाजपाने राहुलवर टीका करताना, भारत दहशतवादाविरुद्धची लढाई नक्की जिंकणार, त्याची जबाबदारी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोडून द्या, असे नमूद करून, तोपर्यंत तुम्ही चीनच्या राजकीय अधिकार्‍यांना लपून-छपून भेटत राहा, असा सल्ला राहुल गांधींना दिला आहे.
 
चीनच्या या भूमिकेविरुद्ध भारतात निषेधाचे सूर उमटणे स्वाभाविक होते. पुन्हा एकदा नेटिझन्सनी चीनविरोधी सूर आळवला आहे. चीनची उत्पादने वापरणे बंद करा, अशा पोस्ट टाकल्या जाऊ लागल्या आहेत. खरेतर चीनने भारताकडे मसूदबाबत अधिकचे पुरावे मागण्याची आवश्यकताच नाही. भारताने मसूदच्याच नव्हे, तर पाकिस्तानामध्ये आश्रय घेतलेल्या 20 दहशतवाद्यांची आणि त्यांनी केलेल्या हिंसाचाराचाराच्या घटनांची यादी पुराव्यांसह पाकिस्तानकडे सोपविली आहे. ही यादी पाकिस्तानला सोपविल्याचे आणि त्यातील दस्तावेजांची माहिती मित्रदेश चीनपर्यंत पोहोचली नसावी, असे शक्यच नाही. मसूद अझहर हा पाकिस्तानच्या पंजाब इलाख्यातील बहावलपूरचा रहिवासी असून, त्याने 2000 साली जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या काळात 1999 साली काठमांडू-दिल्ली आय सी 814 विमानाचे अपहरण झाले होते. हा कट मसूदचा मेहुणा युसूफ अझहर याने रचल्याचा कयास आहे. अपहृत प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात, त्या वेळी भारताच्या ताब्यात असलेल्या मसूदची सुटका करण्याची मागणी केली गेली. ती मान्य करून, मसूदला विशेष विमानाने अफगाणिस्तानच्या कंदहार येथे पोहोचवण्यात आले होते. त्या घटनेच्या पुढील वर्षी म्हणजे 2000 साली त्याने पाकी लष्कर आणि आयएसआयच्या सहकार्याने जैशची स्थापना करून अतिरेकी कारवाया प्रारंभ केला. 2001 सालचा संसदेवरील हल्ला, जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेवर झालेला हल्ला तसेच पठाणकोटमधील भारतीय वायुदलाच्या तळावरील हल्ल्यामागे मसूदचेच डोके होते, हे लपून राहिलेले नाही. ही सारी माहिती असूनही चीन अझहरच्या कारवायांकडे दुर्लक्ष करीत आहे.
 
खरेतर चीनशी भारताचे संबंध सुधारत आहेत. शी जिनिंपग यांच्या भारतभेटीनंतर तर उभय देश जवळ आले आहेत. जवळपास साडेपाचशे चिनी कंपन्या भारतात त्यांची सेवा देत आहेत. नागपुरातील आपल्या मेट्रोचेच उदाहरण घ्या, नागपूरकरांवर मोहिनी घालणार्‍या या मेट्रोचे डबे चीनमधून आयात केले जात आहेत. चिनी इलेट्रॉनिक वस्तूंनी भारताच्या बाजारपेठा अक्षरशः काबीज केल्या आहेत. किफायतशीर भावांमुळे या उत्पादनांवर भारतीयांच्या उड्या पडत आहेत. स्वदेशी चळवळीमुळे चिनी उत्पादने नाकारण्याकडे थोडाफार कल असला, तरी ही चळवळ अजून रुजण्याची गरज आहे. या देशाला जोवर आर्थिक फटका बसणार नाही, तोवर त्याचे शेपूट वाकडेच राहणार आहे. स्वस्त उत्पादने जगाच्या बाजारपेठेत कोंबून चीन, अमेरिकेसारख्या देशालाही नकार देण्याची ताकद बाळगतो आहे. येत्या काळात जागतिक मित्रांच्या सहकार्याने चीनचे नाक दाबण्याची गरज निर्माण झाली आहे.