मुख्यमंत्री ग्राम परीवर्तकावर ॲसिड हल्ला
   दिनांक :15-Mar-2019
गडचिरोली,
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायतचे ग्रामपरिवर्तक समाधान कस्तुरे  यांच्यावर गुरुवारी (१४ मार्च) मध्यरात्री अज्ञात इसमांनी ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
 
 
तालुक्यातील लगाम ग्रामपंचायत कार्यालयात परिवर्तक म्हणून कार्यरत समाधान कस्तुरे हे आपल्या खोलीत झोपेत असताना गुरुवारी मध्यरात्री अज्ञात इसमांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून ॲसिड हल्ला केला. यामध्ये त्यांच्या शरीराचे बहुतांश भाग जळले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती लगाम चे सरपंच मनीष मारटकर यांना कळताच मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान त्यांना चंद्रपूर येथे हलविले. सध्या ते एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
 
सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी लगाम चे सरपंच मनीष मारटकर यांच्याशी भ्रमणध्वनी ने संपर्क करून घटनेची माहिती घेऊन समाधान कस्तुरे यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली. सदर ॲसिड हल्ला करणारे नेमके किती जण आहेत? याचा पोलिस तपास करत असून सदर घटनेचा सर्वांकडून निषेध करण्यात येत आहे.