कसाबने 'याच' पुलावरून झाडल्या होत्या गोळ्या
   दिनांक :15-Mar-2019
मुंबई,
मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला आठवला तरी, आजही अंगावर काटा उभा राहतो. ती कटू घटना आठवण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्याची आज घडलेली दुर्दैवी घटना. स्थानकावरील याच पुलावरून अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल कामा रुग्णालयाकडे गेले होते.

 
 
२६/११ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बेछूट गोळीबार केल्यानंतर कसाब याच पुलावरून कामा रुग्णालयाकडे जाताना एका छायाचित्रकाराने त्याचा फोटो टिपला होता. फ्लॅशचा प्रकाश पडताच कसाबने छायाचित्रकार उभे असलेल्या खिडकीवरही जोरदार गोळीबार केला होता. त्यानंतर कसाब आणि त्याचा साथीदार पुढे निघून गेले होते. या पूल दुर्घटनेच्या निमित्ताने आज पुन्हा त्या काळरात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हिमालया पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. पादचारी पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्याने त्यात ५ जणांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले. या अपघातातील जखमींना जीटी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.