जबाबदारी कुणाची हे संध्याकाळपर्यंत ठरवा- मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना आदेश
   दिनांक :15-Mar-2019
मुंबई,
'स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते धक्कादायक आणि गंभीर आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे संध्याकाळपर्यंत निश्चित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले.
 

 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसच्या जवळचा हिमालय पूल कोसळून काल सहा मुंबईकरांचा मृत्यू झाला तर ३४ जण जखमी झाले. हा पूल नेमका कोणाच्या अखत्यारीत येतो यावरून मुंबई महापालिका व रेल्वे प्रशासनामध्ये जुंपली. त्यामुळं मुंबईकरांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
 
 
 
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सीएसएमटी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. 'ऑडिट होऊनही पूल कोसळणं ही गंभीर घटना आहे. ऑडिट झालेल्या पुलांची पुन्हा तपासणी करण्यात येईल. या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुलाच्या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची हे संध्याकाळपर्यंत निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.