श्रद्धाची जागा घेतली 'या' अभिनेत्रीने
   दिनांक :15-Mar-2019
गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला भारताची फुलराणी सायना नेहवालचा जीवनपट पुन्हा रखडला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या व्यग्र वेळापत्रकामुळे तिने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे समजत आहे. आता श्रद्धाच्या जागी अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत झळकणार आहे.
 
 
सप्टेंबर २०१८मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र चित्रीकरण सुरू होताच श्रद्धाला डेंग्यू झाल्यामुळे  तिने काही काळ ब्रेक घेतला होता. एप्रिलमध्ये पुन्हा सायनाच्या चित्रपटाचे काम सुरू होणार होते मात्र तिने आधीच दुसऱ्या चित्रपटांसाठी तारखा दिल्या असल्यामुळे तिला चित्रपट सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. 'छिछोरे' आणि 'स्ट्रीट डान्सर' या दोन चित्रपटांमध्ये सध्या श्रद्धा व्यस्त आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सर्व प्रयत्न करूनही तारखांची जुळवाजुळव होत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने श्रद्धाला हा चित्रपट सोडावा लागला आहे. हा निर्णय निर्माते आणि श्रद्धा दोघांच्या सहमतीने घेण्यात आले. परिणीती चोप्राला चित्रपटाची कथा पसंत आल्यानंतर तिने लगेचच होकार कळवले . निर्माते भूषण कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा देत, 'आम्ही २०१९मध्ये चित्रपटाचे  चित्रीकरण पूर्ण करण्याचे प्रयत्न करून २०२०मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा विचार आहे.'  असे ते म्हणाले.