मशिदींमध्ये अंदाधुंद गोळीबार; ४९ जणांचा मृत्यू
   दिनांक :15-Mar-2019
न्यूझीलंड:
 न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले होते. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली असून ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस प्रमुख माईक बुश यांनी दिली. 

 
पोलिसांनी ख्राईस्टचर्च येथे गंभीर परिस्थिती निर्माण झाले असल्याचे आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मशिद अल नूर येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम जमलेले होते. यामध्ये बांगलादेश क्रिकेट संघदेखील होता. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू सुरक्षित आहेत.
 
 
 
एका साक्षीदाराने stuff.co.nz ला दिलेल्या माहितीनुसार आपण प्रार्थना करत असताना गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिले असता आपली पत्नी रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेली होती. दुसऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलांवर गोळीबार होताना पाहिल्याचे सांगितले. माझ्या आजुबाजूला सगळीकडे मृतदेह होते असे त्यांनी सांगितले.
 
 
 
हल्लेखोराने लष्कर जवानांसारखे कपडे परिधान केले होते अशी माहिती आहे. मात्र अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान गोळीबारानंतर परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 
बांगलादेश क्रिकेट संघाच्या प्रवक्त्याने संपूर्ण संघ सुरक्षित असून त्यांना मानसिक धक्क्यात असल्याची माहिती दिली आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आलं आहे.