दिल्लीला नमवित विदर्भ ठरला ‘चॅम्पियन'
   दिनांक :15-Mar-2019

 
 पवन परनातेचे नाबाद ८८ धावा
 
नागपूर: यंदाच्या घरगुती क्रिकेटच्या हंगामात विदर्भ संघाने सलग चौथ्यांदा ऐतिहासिक कामगिरी करीत विदर्भ च्या विजेतेपदाच्या शिरपेचात आणखी एक मुकूट प्राप्त केला आहे. २३ वर्षांखालील विदर्भाच्या संघाने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्लीवर चार गड्यांनी मात करत पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. पवन परनातेने काढलेल्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर विदर्भाने सिनीअर, ज्युनिअर अशा विविध गटात यंदाच्या वर्षातील चवथे विजेतेपद पटकाविले आहे. सिनीअर संघाने यंदाच्या हंगामात रणजी व इराणी करंडकाचे विजेतेपद तर १९ वर्षांखालील संघाने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
 

 
 
 
हैदराबाद येथे २३ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना दिल्ली विरुद्ध विदर्भ संघात झाला. या लढतीत विदर्भाचा कर्णधार मोहित काळेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भच्या कर्णधाराने घेतलेला निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थकी ठरविला, व दिल्ली संघाचा डाव २११ धावांवरच रोखला. प्रत्युत्तरात विदर्भ संघाची सुरुवात निराशाजनक झाली. विदर्भाच्या वरिष्ठ संघाकडून टी २० स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा आणि अंतिम सामन्यात दाखल झालेला सलामीवीर अथर्व तायडे व अक्षय दुल्लरवार जोडीला चांगली सुरुवात करून देण्यात अपयश आले. अथर्व ५, तर अक्षय १२ धावांवर तंबूत परतले. त्यामुळे विदर्भाची २५ धावांवर २ बाद अशी अवस्था झाली. दोन गडी लवकरच बाद केल्यावर दिल्लीचे गोलंदाज विदर्भाच्या फलंदाजांवर वर्चस्व निर्माण करेल असे वाटले होते. मात्र फलंदाजीला आलेला संघाचा यष्टीरक्षक पवन परताने आणि नयन चव्हाण यांनी संयमी फलंदाजी करत संघासाठी १०३ धावांची मोठी भागीदारी रचली. तर खराब चेंडूवर फटकेबाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. दरम्यान परनातेने अर्धशतकही पूर्ण केले. अर्धशतकाकडे वाटचाल करीत असतांना नयन चव्हाण ४८ धावांवर योगेश शर्माचा बळी ठरला. त्यावेळी विदर्भाची ३ बाद १२८ अशी अवस्था होती.
 
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या मोहित काळेने संयमी फंलदाजी करत विजयी लक्ष्याचा समीप संघाला पोहचविले. मात्र, संघाची १७१ धावसंख्या असतांना मोहित २९ धावांवर तंबूत परतला. एकीकडे विदर्भ संघ विजयी लक्ष्याचा सहज पाठलाग करेल असे वाटत होते. मात्र, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पार्थ रेखडे २ आणि मोहित राऊत ० धावांवर झटपट बाद झाल्याने विदर्भाची ६ बाद १७८ अशी अवस्था करत दिल्लीने सामन्यात परतण्याचा काहीवेळ प्रयत्न केला. मात्र, परनाते एका बाजूने संघाचा डाव सांभाळून ठेवला होता. तर दुसèया बाजूने फलंदाजीला आलेल्या दर्शन नळकांदेनेही १५ चेंडूत दोन चौकार व दोन षटकारांच्या सहाय्याने २४ धावा करत ४८.२ षटकातच संघाला लक्ष्य गाठून दिले. पवन परनाने १३२ चेंडूत ८८ धावांवर नाबाद होता. पवनने संयमी खेळीत सहा चौकारांचा समावेश होता. गोलंदाजीत दिल्ली कडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३७ धावात ४ गडी तर अभिषेक वत्स आणि योगेश शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
 
तत्पुर्वी पार्थ रेखडेच्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीपुढे दिल्ली संघाचा डाव ५० षटकांत २११ धावांवर संपुष्टात आला. दिल्लीकडून सलामीला आलेल्या आयुष बदोनी आणि कुंवर बिढूरी यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यामुळे १६ धावांवरच दिल्ली संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर वैभव कंडपाल याने काहीवेळा संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू तोही अधिक वेळ टिकू शकला नाही. वैभव ३९ धावांवर बाद झाला. नंतर आलेला विकास दिक्षीतही अधिक वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळे ९० धावांवर चार गडी दिल्ली संघाने गमविले होते. दरम्यान कर्णधार ललित यादवने एका बाजूने संघाचा डाव सावरुन धरला. त्याने संघासाठी ८२ चेंडूत ६५ धावांची तर सुमीत माथूर ६५ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. विदर्भाकडून पार्थ रेखडेने ३३ धावात चार गडी बाद केले. तर नचिकेत परांडेने दोन आणि ए देशपांडेने एक गडी बाद केले.