पुन्हा मोदीच हवेत...
   दिनांक :16-Mar-2019
जगभरातील भारतीयांच्या शुभेच्छा
 
भारतात लोकसभा निवडणुकांमध्ये काय निकाल येतो, याची उत्सुकता जगभर विखुरलेल्या भारतीयांना आहे. तशीच ती जगातील प्रमुख देशांसह अगदी लहानसहान देशांनाही आहे. त्याचे कारण म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांच्या काळात भारताचा बदललेला चेहरामोहरा, विकासाचा झंझावात आणि सर्वांशी मैत्रीचे असलेले परराष्ट्र धोरण यामुळे भारताच्या विकासाला हातभारच लागत आहे.
 

 
 
अनेक देशांमध्ये भारतीयांकडून पंतप्रधानपदी पुन्हा मोदीच हवेत, अशी इच्छा जाहीर केली जात आहे. अशीच एक रॅली नुकतीच लंडनमध्ये काढण्यात आली. समस्त भारताची शान सर्वच बाबतीत जगभर वाढत असून त्याची महती अनेकांपर्यंत पोहचावी, या हेतूने लंडनमधील भारतीयांनी ‘सपोर्ट ऑफ इंडिया’ या शीर्षकाखाली भव्य बाईक रॅलीचे यशस्वी आयोजन केले. ते पाहून समस्त लंडनवासीयांच्या डोळयांचे पारणे फिटले. ऐतिहासिक मार्बल आर्क, ट्रॅफलगर स्क्वेअर, पार्लमेंट स्क्वेअर, लंडन ब्रिज या परिसरातून तिथल्या नागरिकांनीही स्वागत करून आपलादेखील भारताला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले. भारताचे तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या घोषणांनी परिसर दुमदुमून जात होता.
 
भारतातून विदेशात गेलेली मंडळी यात मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. एस कॅफे लंडन या लंडनमधील प्रसिद्ध मोटरसायकल समूहाचे स्वारदेखील स्वतःहून उत्साहाने सहभागी झाले होते. एस कॅफेच्या उत्तरेकडील भागातून निघालेली ही रॅली नॅसडेन येथील श्री स्वामीनारायण मंदिरापर्यंत पोहचली. त्यावेळी आबालवृद्धांनी त्याचे भव्य स्वागत केले. सकाळच्या कडाक्याच्या थंडीतदेखील त्यांचा उत्साह विशेष होता. पारंपारिक वेषात या मुलांनी गणेश श्लोक गायले. सुमारे चार तास लंडनच्या रस्त्यावर हा उत्साह दिसून आला.
 

 
 
भारताची आजवरची प्रतिमा बदलण्यासाठी प्रगतशील भारतातील मुलभूत सोयीसुविधांचे देखील प्रदर्शन त्यांच्याजवळील फलकातून दिसत होते. रस्त्यांचे जाळे, बदललेले ग्रामीण जीवन, सोयीसुविधा आदींचे दर्शन त्यातून होत होते. या उपक्रमापासून प्रेरणा घेत विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी अशाप्रकारची रॅली बर्मिंगहम, मिल्टन किनेस, मँचेस्टर, लीड्स आणि स्कॉटलंड येथे घेण्याचे निश्चित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे समस्त भारतीयांना अभिमान वाटत असून बदलत्या भारताचे चित्रण विदेशातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा निर्धार आहे.