निवडणुका पाहून चित्रपटसृष्टीही मैदानात
   दिनांक :16-Mar-2019
 राजकीय राष्ट्रप्रेमावरील चित्रपटांची धूम
 
 
राजकीय क्षेत्र आणि चित्रपटसृष्टी यांचा तसा जवळचा संबंध आहे. अनेक मोठे अभिनेते उतरत्या वयात राजकारणात येतात आणि दक्षिणेत तर बहुतांश राजकीय नेते चित्रपटसृष्टीतील अभिनेतेच असल्याचे मागील अनेक वर्षापासून अनुभवता येते.
आता लोकसभा निवडणुका आल्यानंतर या संधीत चित्रपटसृष्टी कशी मागे राहणार. ती देखील सरसावली असून राजकीय व राष्ट्रवाद या विषयावरील चित्रपटांना सातत्याने मागणी वाढत आहे. येत्या काळात या विषयावरील अनेक चित्रपट खाजगी वाहिन्या आणि चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होण्याची शक्यता दिसून येत आहे. यात नुकताच प्रदर्शित झालेला ‘उरी’ याला बरीच मागणी होत आहे.
 
दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर लष्कराने केलेला पहिला सर्जिकल स्ट्राईक या विषयावर हा चित्रपट असल्याने तो प्रचंड गाजला. आता दुसरा एअर स्ट्राईक, विंग कमांडर अभिनंदनची दोनच दिवसांत मुक्तता यामुळे देशात राष्ट्रप्रेमाचे उधाण आले आहे. या विषयावरही चित्रपट तयार होत आहे. तूर्त उरी चित्रपटाला अनेक राजकीय पक्षांची मागणी आहे. निवडणूकांचा काळ, त्यात होणारं राजकारण अनेक वेळा बॉलिवूड चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि राजकारण यांचा जवळचा संबंध असल्याचं पाहायला मिळतं. आजवर अनेक चित्रपट दिग्दर्शकांनी राजकारणावर आधारित चित्रपटांची निर्मिती करत समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
या क्षेत्रातील विषयावर आठ वर्षापूर्वी अभिनेता अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्याचा राजनिती हा चित्रपट प्रकाश झा यांनी आणला होता. आणि हा चित्रपट लोकप्रिय देखील झाला होता.
 
प्रकाश झा यांचाच ‘सत्याग्रह’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर भरपूर कमाई करून गेला. यात अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत होते तर त्यांच्यासोबत अर्जुन रामपाल, मनोज वाजपेयी, अमृता राव यांच्याही भूमिका आहेत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलेल्या उपोषणावर आधारित या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली होती.
‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटाची निर्मिती के.सी बोकाडिया यांनी केली होती. हा चित्रपट राजकीय नाट्य म्हणून गाजले. यात अभिनेत्री मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत झळकली होती . तिच्यासोबतच ओमपुरी आणि नसिरुद्दीन शहा यांच्यासारख्या नावाजलेल्या कलाकारांचाही सहभाग होता. राजस्थानमधील भवरी देवीच्या सत्यघटनेवरून प्रेरणा घऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. राजस्थानमधील एका शक्तीशाली नेत्याद्वारे भवरीदेवीची हत्या करण्यात आली होती. या चित्रपटात मल्लिकाने भवरीदेवीची भूमिका साकारली होती.
 
२००९ साली अनुराग कश्यप यांचाही एक चित्रपट आला होता. या चित्रपटात राज सिंह चौधरी, दीपक डोबरियाल यासारखी स्टारकास्ट मंडळी झळकली होती.
 
एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालेल्या अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘नायक : द रियल हीरो’ हा चित्रपट धमाल करून गेला. हा चित्रपट त्याकाळी बॉक्सऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटामध्ये राजकारण, समाजातील उदासीनता आणि भ्रष्टाचार यावर भाष्य होते. राजकीय क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्वावर आधारित ‘सरकार’ या चित्रपटाची निर्मिती झाली होती. चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या पिता-पुत्राच्या जोडीने एकत्र भूमिका केली होती. त्याच्यासोबतच कतरिना कैफ, तनिशा, अनुपम खेर, सुप्रिया पाठक हे सहकलाकारही झळकले होते.
 
चित्रपट दिग्दर्शिका नंदिता दास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘फिराक’ हा पहिला चित्रपट आहे. गोध्रा हत्याकांडाच्या त्याचा काय परिणाम झाला, याचे दर्शन या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. अभिनेता नसिरुद्दीन शहा, दीप्ती नवल, नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल, संजय सुरी, रघुवीर यादव, शहाना गोस्वामी यांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
देशातील राजकीय, आर्थिक घडामोडींवर अभ्यासपूर्ण सिनेभाष्य करण्यासाठी प्रकाश झा ओळखले जातात. रंग दे बसंती, राजनीती, अपहरण, गंगाजल या चित्रपटांमधून त्यांनी गंभीर विषय संवेदनशीलतेनं मांडले. या चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी चक्रव्यूह या चित्रपटाची निर्मिती केली. ‘चक्रव्यूह’ या चित्रपटातून त्यांनी नक्षलवादाचा, विषय हाताळला होता. या चित्रपटात अर्जुन रामपाल, अभय देओल, मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
त्यासोबत अभिनेता विवेक ओबेरॉय याची मुख्य भूमिका असलेला रक्तचरित्र या चित्रपटाची निर्मिती राम गोपाल वर्मा यांनी केली होती. या चित्रपटामध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि सुदीप हे कलाकार देखील झळकले आहेत. मे २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘युवा’या चित्रपटात अजय देवगण आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारकाळ तग धरू शकला नाही.