कामविभागणी आणि जबाबदारी
   दिनांक :16-Mar-2019

रात्रीस खेळ चाले...

पराग जोशी
९८८१७१७८०५ 
 
निवडणुका आल्या, आता काही दिवसात प्रचाराची धुमश्चक्री सुरू होईल. त्यासाठी तयारीला प्रारंभ झाला असून अता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. आजवर सर्वत्र अनिश्चिततेचे सावट आणि धावपळ, पळापळ सुरू होती आता त्यांना विराम मिळाला आहे. अजूनही प्रचार कार्यालये स्थापन झालेली नाहीत. त्यामुळे म्हणावा तसा निवडणुकांना रंग आलेला नाही. यावेळी निवडणुकीपूर्वी होळी असल्यामुळे खर्‍या अर्थाने रंगारंग निवडणुका अनुभवता येणार आहेत.
 
राजकीय क्षेत्रातील ज्या पक्षांचे कॅडर आहे किंवा ज्यांनी फार पूर्वीपासून निवडणुकांच्या हेतूने स्वत:ची आणि कार्यकर्त्यांची तयारी करून घेतली, अशा राजकीय पक्षांची कामे जवळपास तयार म्हणजे रेडी टू वर्क आहेत. आता ऐनवेळेवर करण्याची कामे तेवढी शिल्लक आहेत. त्यात काही कायदेशीर बाबी आहेत तर काही राजकीय बाबी आहेत. या दोन्ही आघाड्यांवर राजकीय पक्ष तयार असून आता केवळ कामाची विभागणी तेवढी उरली आहे. काही ठिकाणी तर ती देखील झालेली आहे. फक्त संबंधित उमेदवारांच्या नावांची घोषणा तेवढी बाकी आहे.
 
 
 
विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यालयांच्या जागा निश्चित झाल्या आहेत. त्यांचे प्रमुख, त्यांचे मदतनीस, कार्यालय प्रमुख, प्रचारप्रमुख, बुथप्रमुख, पेजप्रमुख, मतदार याद्यांचा अभ्यास आदी कामांची पूर्तता करण्यास प्रारंभ झाला आहे.
येत्या काळात या कामांना वेग येईल. आतापर्यंत प्रचारसाहित्य देखील तयार झाले आहे. त्याचे वाटप, गाड्यांची रचना, सरकारी परवानग्या, आचारसंहिता विभाग आदी कामे कायद्याच्या जाणकारांकडे देण्यात येतात.
 
साधारणत: पक्षाच्या अधिवक्ता आणि लेखाकार आघाडीकडे ही कामे सोपविली जातात. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते परत घेत पर्यंतची सर्व कामे या आघाडीला करावी लागतात आणि आता तर सर्व प्रक्रिया ऑनलाईन आणि वेबबेस्ड असल्यामुळे ही कामे गतीने होत आहेत.