‘नो फादर्स इन कश्मीर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
   दिनांक :16-Mar-2019
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा ‘नो फादर्स इन कश्मीर’ या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने घातलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यानंतर नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यासोबतच चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले . या चित्रपटातून हिंसाचार आणि द्वेष यांना प्रोत्साहन देणारे सीन असल्याचे सांगत चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ८ महिन्याच्या संघर्षानंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र देत बंदी उठविली आहे. हा चित्रपट येत्या ५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
 
 अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान या चित्रपटात झळकणार असून त्यांच्याशिवाय अश्विन कुमार, अंशुमान झा आणि कुलभूषण खरबंदा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दरम्यान, ‘हर कोई सोचता है की वो कश्मीर को जानता है..’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून चित्रपटातून काश्मीरचं वास्तव आणि तिथल्या लोकांची खरी परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.