आसनाची आस!
   दिनांक :16-Mar-2019
ही तो रश्रींची इच्छा!
- र. श्री. फडनाईक
सामटीतल्या नाम्यासारखाच दामटीतला दाम्या राजकारणातला किडा आहे! दाम्याच्या तुलनेत नाम्याची राजकीय पोच तशी किडकिडीत; दाम्या कसा एकदम परफेक्ट! झालं काय, की सार्‍या गावच्या पंचाईती सोडवता सोडवता दाम्याला स्वत:साठी फार कमी वेळ मिळाला! एक सुबकशी, सुग्रण, सुजाण, सुशील, चांगल्या व श्रीमंत घराण्याची मुलगी लक्ष्मी म्हणून घरात आणावी, अशी त्याची, पंचविशी गाठल्यापासूनची इच्छा! मॅट्रिक झाल्यावर बापानं त्याला शेतीत घातलं. हाती रुम्न दिलं. दाम्याचं मन रुम्न्यात कसं रमेल? शेतकर्‍याला कोणी पोरगी देते का? दाम्या तसा चौकस! राजकारणातच मान, सन्मान, (मान)धन- सारं काही मिळते हे त्याच्या नजरेनं केव्हाच हेरलं होतं अन्‌ संधी साधून त्याने राजकारणात उडी घेतली! उडी आणि कोलांटउडी यात दाम्या सुरवातीपासूनच तरबेज! त्यामुळे सरपंचाची खुर्ची खेचण्यात त्याला फार वेळ लागला नाही! परंतु ही छोटेखानी खुर्ची त्याच्या उंचपुर्‍या देहाशी काही सुसंगत नव्हती. त्याने तिच्याशी मैत्री जरूर केली, पण नेहमीसाठी अंगीकारली नाही ती!
 
इकडे दाम्याचं वय वाढतच चाललं, अन्‌ तिकडे त्याचं पोरी पाहणं काही थांबेना! खेड्यातली पोरगी दाम्याला पसंत नसेल, म्हणून त्याच्या बापानं तालुक्याची पोरगी दाखविली, जिल्ह्यात नेलं, तिथली फॅशनेबल गर्ल दाखविली; पण दाम्याची फायनल पसंती काही आली नाही! दोस्ती करायचा तो, मैत्री करायचा तो त्याच्याशी; मैत्रीची मर्यादाही पाळायचा तो; पण म्हणायचा, मला याच्यापेक्षा चांगली पोरगी भेटेल; थांबा, वाट पाहा!
 
 
 
आता दाम्या ऐंशीला टेकला आहे! पण हिंमत हारला नाही. लग्नासाठी पोरी पाहणं सुरूच आहे दाम्याचं! जेव्हा जेव्हा त्याच्या घरी मी जातो, तेव्हा तेव्हा मला तो त्याचं ते टिनाचं संदूक दाखवतो. म्हणतो, रम्या! ह्या माझ्या मुंडावळ्या, हे माझं बािंशग, ही माझी शेरवानी; आता बरीच तंग होते, पण तरी मला ती शोभते! हा माझा फेटा! केस काळे करण्याचा कलपही जोपासून ठेवला होता, पण टक्कल पडल्यामुळे तो एवढ्याच शेजारच्या पोराला देऊन टाकला! हा सेंटचा फवारा! आणखीही बरीच काही सामग्री त्याने संदुकातून काढून मला दाखविली. अगदी व्यवस्थित ठेवली त्याने ती!
 
मी म्हटलं, दाम्या! तुझे सारे दात पडले, कान पार फुटले; अन्‌ तुला हे लग्नाचे काय डोहाळे लागले! कोण करणार तुझ्याशी लग्न! अन्‌ त्यात तुला पुन्हा दिल्लीची पोरगी पाहिजे! आता एवढाच टेकीला पोहचला आहेस, तर सामटीतल्या बैना बुढीशी बोलून पाहतो बा! ती दिल्लीची नाही, पण किसान मोर्चासाठी तिला मजुरी देऊन दिल्लीला नेलं होतं. चांगली चार दिवस तिथं होती! संसद भवनही पाहून आली. विचारू का मग बैना बुढीला! पण त्याआधी, दाताची नवी कवळी बसून घे! कानासाठी नवं डिजिटल कर्णयंत्र आण! मोठ्या भिंगाचा चष्मा विकत घे!
 
दाम्या तसा हुशारच! म्हणाला, बैना बुढीला जरूर विचार. तिचा होकार असला, तरी माझा होकार सध्या कळवू नको. प्रकरण पेंडिंग ठेव! एवढ्यात दिल्लीत एक मोठा वर-वधू मेळावा भरत आहे! माझे ५-६ वर्‍हाडी घेऊन मी तिथे जाईन! पाच-सहा झाले तरी काय झाले, ते सारे तालेवार आहेत! त्यांची मला गॅरंटी आहे. तू पाहतच राहा रम्या, यावेळी खाली हातानं वापस येणार नाही हा दाम्या! हे घे पैसे अन्‌ रिसेप्शनच्या तयारीला लाग! धडाक्यात झालं पाहिजे ते!
 
दिल्ली वधू-वर मेळाव्यासाठी तुमचा कोणी बाशिंग्या असेल, तर त्यालाही पाठवा! नशीब अजमावयला काय हरकत आहे! मेळाव्यात बरीच खिचाखिची होणार असल्याचे राजकीय भाकीत एवढ्यात एका परिपक्व नेत्याने केले आहे. तेव्हा प्रत्येकाला चान्स घेऊ द्या!