पक्षांतराय नम:
   दिनांक :16-Mar-2019
शुभ बोल रे...
विनोद देशमुख
९८५०५८७६२२
 
आमच्या बालपणी भूगोल विषयात वारे शिकवत असत. नैऋत्य मोसमी वारे, खारे वारे, मतलई वारे वगैरे वगैरे. भूगोल तोच आहे, वारे मात्र बदलले! आजच्या जगात मतलबी वारे जास्त जोराने वाहताना दिसतात! त्यातही राजकारणात हे वारे जास्तच आहेत. आणि, निवडणुकीच्या हंगामात तर हे वारे वादळाचे रूप धारण करतात. त्यामुळे होत्याचे नव्हते होऊन जाते! पक्षोपपक्षांमध्ये हे मतलबी वारे सुनामीसारखे वाहताना दिसतात. त्यात वारे वाहवणारे फायद्यात राहतात; इतर अनेकांचे मात्र नुकसान होते.
 
असेच, पक्षांतराचे वारे सध्या जोरात वाहत आहेत. काय तर म्हणे, या पक्षातून त्या पक्षात गेला अन्‌ नव्या पक्षाने त्याला लगेच लोकसभेचे तिकीटही दिले! जवळपास सर्वच पक्षांमध्ये हे मतलबी वारे सध्या वाहत आहेत. कॉंग्रेस कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले, तर भद्रावतीचे शिवसेना आमदार बाळूभाऊ धानोरकर कॉंग्रेसमध्ये, मनसेचे आमदार शरद सोनावणे शिवसेनेत, डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत. मोहिते पाटलांचा मुलगा राष्ट्रवादीतून भाजपात जाऊ घातला आहे.
 
 
 
एवढ्या घाऊक प्रमाणावर मतपरिवर्तन फक्त निवडणुकीच्या तोंडावरच कसे काय होते, हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही बघा. त्यांना काय माहीत की, हे मतांसाठी परिवर्तन असते, म्हणून तर त्याला मतपरिवर्तन म्हणतात! खरं तर याला मतपरिवर्तन नव्हे, निष्ठाबदल म्हटले पाहिजे. निवडणुकीसाठी एक पक्षनिष्ठा सोडून दुसरी पक्षनिष्ठा पकडायची. मुख्य कारण उमेदवारी. सारा खटाटोप पद मिळविण्यासाठी. यालाच आपल्याकडे राजकारण म्हणतात!
 
या पक्षांतराची मोठी गंमत असते. स्वपक्षातून जाणारा गद्दार असतो अन्‌ येणारा मात्र प्रवेशालाच निष्ठावान बनतो! जातो त्याला शिव्यांची लाखोळी, तर येतो त्याच्यासाठी पायघड्या आणि तिकीट! सर्वच पक्षांमध्ये हेच हाल आहेत. हमाम मे सब नंगे है! गावरान भाषेत सांगायचे तर... घरची म्हणते देवा देवा अन्‌ बाहेरचीला चोळी शिवा असा सारा मामला.
 
यात सर्वाधिक गोची होते ती निष्ठावंतांची. त्यांना कोणी विचारातच घेत नाही. जनसंपर्क, बैठका, प्रचारसभांंचे आयोजन ते बिचारे निष्ठेने करीत असतात. पक्षासाठी. नेता कोणीही असो. पक्षांतराच्या गदारोळात त्यांचे सतरंज्या अंथरणे आणि उचलणे तसेच कायम असते. फक्त बदलते, कोणाचा आगे बढो म्हणायचा, त्याचे नाव! निवडून येण्याच्या गोंंडस नावाखाली सर्वच पक्षांची तात्त्विक बैठक हलली आहे आणि आयाराम गयाराम यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे पक्षांतर पचविण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. सर्व पक्षांनी सध्या आयारामांसाठी आपापले दरवाजे उघडे केले आहेत, ते त्यामुळेच!